Home ठळक बातम्या अभिमानास्पद : ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या ‘मराठमोळ्या कल्याणकराची’ थेट पोलीस अधिकारीपदी झेप

अभिमानास्पद : ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या ‘मराठमोळ्या कल्याणकराची’ थेट पोलीस अधिकारीपदी झेप

कहाणी सामान्य कुटुंबातील आई वडीलांच्या कष्टाची आणि मुलाच्या जिद्दीची

कल्याण दि.3 जानेवारी :
आपल्या मराठीत एक म्हण आहे “आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे”. मात्र कल्याणातील हरिभाऊ आणि हौसाबाई घुगे यांच्या कुटुंबासाठी ही नुसतीच एक म्हण राहिली नसून हे संपूर्ण कुटुंबच त्याचे एक ज्वलंत आणि तितकेच प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. या मराठमोळ्या घुगे कुटुंबातील दुसऱ्या पिढीने आई वडीलांच्या कष्टाला आपल्या स्वकर्तुत्वाच्या बळावर अशी एक प्रतिष्ठा मिळवून दिली आहे की त्यांचे करावे तितके कौतुक कमी ठरेल. या दुसऱ्या पिढीतील अशोक हरिभाऊ घुगे यांनी ऑस्ट्रेलियात थेट पोलीस अधिकारी पदापर्यंत झेप घेतली आहे. सामान्य मराठी कुटुंबातील अशोक घुगे यांचा हा असामान्य प्रवास जितका कठीण आहे तितकाच प्रेरणादायीही.(proud-moment-kalyankar-citizen-becomes-a-police-officer-in-australia)


आई वडीलांचे काबाडकष्ट आणि मुलांचे स्वकर्तृत्व…
मूळच्या नाशिकमधील हिवरे पिंपळे येथील असलेल्या या घुगे कुटुंबियांची कल्याण ही कर्मभूमी. अशोक घुगे यांचे वडील हरिभाऊ बाळाजी घुगे हे कल्याण स्टेशन परिसरात माथाडी कामगार तर आई हौसाबाई घुगे यांचे दूधनाका परिसरातील गोठ्यातील शेण काढून गवऱ्या बनवायचे काम. यावरूनच या सामान्य कुटुंबाच्या परिस्थितीची आपल्याला जाणीव होऊ शकते. मात्र आपल्या आई-वडीलांनी केलेल्या कष्टाची अशोक घुगे आणि इतर मुलांनी केवळ जाणीवच ठेवली नाही, तर प्रत्येकाने स्वकर्तुत्वाने आई वडीलांच्या या काबाडकष्टांना प्रतिष्ठेचे एक अढळ असे कोंदण प्राप्त करून दिले.

1 ते 10 वीपर्यंत झाले या मराठी शाळेत शिक्षण…
सध्या कर्माने ऑस्ट्रेलियन असले तरी अशोक घुगे यांचा जन्म आणि दहावीपर्यंतचे शिक्षण कल्याणातच झाले. “सामान्य कुटुंबांची- सामान्य शाळा” अशी ओळख असलेल्या छत्रपती शिक्षण मंडळाच्या अभिनव विद्यामंदिरमध्ये अशोक घुगे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. मग या शाळेतूनच घडलेल्या इतर असामान्य कर्तृत्ववान विद्यार्थ्यांप्रमाणे अशोक घुगे यांच्याही स्वप्नांचा भक्कम पाया रचण्याचे काम शाळेने आणि त्यातील शिक्षकांनी केले. मग अशोक घुगे यांनीही अनेक संकटं येऊनही न डगमगता या पायावर स्वकर्तुत्वाचा असा कळस चढवला की आज सगळीकडे त्यांचे कौतुक होत आहे.

अशोक यांनी पत्नी कवितासह 2003 मध्येच गाठले ऑस्ट्रेलिया…
उल्हासनगरच्या आर के टी महाविद्यालयातून पुढचे शिक्षण घेतले. अंधेरीतील सिमेन्स कंपनीत फिटर ट्रेडमध्ये 3 वर्षे ॲपरेंटस्शीप प्रथम क्रमांकाने पास केली. नंतर गोडफ्रे फिलिप्स या कंपनीत टेक्निशियन पदावर दिवसा काम करून रात्री श्री भागुभाई माफतलाल पॉलीटेक्निकमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरींगचा डिप्लोमा पूर्ण केला. त्याच दरम्यान तिथले काही मित्र नोकरीच्या चांगल्या संधी आल्याने ऑस्ट्रेलियाला गेले. त्या मित्रांकडून मग आपल्याला तिकडे रोजगाराच्या चांगल्या संधी असल्याचे समजले आणि मग आपण पत्नी कवितासह 2003 मध्येच ऑस्ट्रेलिया गाठल्याचे अशोक घुगे यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियात नोकरी, व्हीआरएस आणि पोलीस खात्यात निवड…
तिकडे गेल्यावर सुरुवातीच्या काळात अशोक यांनी अनेक छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये नोकरी केली. त्यानंतर जनरल मोटर्स या त्यावेळच्या आघाडीच्या वाहन निर्मिती कंपनीमध्ये त्यांनी साडे आठ वर्षे टीम लीडर म्हणून काम केले. सगळं काही सुरळीत सुरू असताना त्यावेळी आलेल्या जागतिक आर्थिक मंदीच्या फेऱ्यात ती कंपनी सापडली आणि मग आपल्याला तिकडून स्वेच्छा निवृत्ती (व्हीआरएस) घ्यावी लागल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस भरतीची संधी आणि दुसऱ्या प्रयत्नात निवड…
अशोक घुगे हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या मेट्रो सिटीमध्ये वास्तव्यास आहेत. जनरल मोटर्समधील नोकरी गेल्याने काही तरी स्थायी स्वरूपाचे काम मिळावे यादृष्टीने त्यांचा विचार आणि प्रयत्न सुरू होते. त्याचवेळी मेलबर्नमधील व्हिक्टोरिया पोलीस या शासकीय विभागात भरती सुरू झाली. मात्र पहिल्या प्रयत्नांत फिटनेस टेस्टमुळे अयशस्वी ठरल्यानंतर नाराज न होता जोमाने पुन्हा प्रयत्न सुरू केले. स्वतःचा शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी रीतसर प्रशिक्षण घेऊन मग दुसऱ्यांदा दिलेल्या पोलीस निवड चाचणीत आपल्याला यश मिळाल्याचे अशोक घुगे यांनी सांगितले. मग तिथल्या पोलीस अकादमीमध्ये लॉ, डिफेन्स टॅक्टिक्स आणि कम्युनिकेशन स्किल्स या विषयांचे 3 महिन्याचे प्रशिक्षण घेऊन खऱ्या अर्थाने मग पोलीस वयाच्या 41 व्या वर्षी आपला पोलीस खात्यातील प्रवास सुरू झाल्याचे त्यांनी “एलएनएन”शी बोलताना सांगितले.

भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना…
वर्णद्वेषाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ले वाढले होते. त्याची दखल घेत हे हल्ले रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या तत्कालीन पंतप्रधान ज्युलियन गिलार्ड यांनी देशातील मेट्रो, बस स्टेशन आणि महत्त्वाच्या सार्वजनिक वाहतूक ठिकाणांसाठी PSO (Protective Security Officer) विशेष पोलीस पथकं तैनात करण्याचा निर्णय घेतल्याचे अशोक घुगे यांनी सांगितले. सध्या अशोक घुगे हे याच PSO (Protective Security Officer) पथकात सार्जंट या अधिकारी पदावर कार्यरत आहेत. इतकेच नाही तर भारतीय आणि त्यातही विशेषतः मराठी पर्यटकांसाठी त्यांनी आपल्या पोलीस युनिफॉर्मवरील नावाच्या प्लेटखाली “मी मराठी बोलतो” असे लिहिले असल्याचे त्यांनी अतिशय अभिमानाने सांगितले.


त्यांची पत्नीही आहे तिकडे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत…
विशेष म्हणजे अशोक घुगे हे एकीकडे पोलीस दलातून देशसेवा बजावत आहेत. तर त्यांच्या पत्नी कविता या तिकडे रजिस्टर नर्स असून गेल्या 15 वर्षांपासून तिथल्या शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा करीत आहेत. लहान मुलांचे आय सी यू म्हणजेच NICU मध्ये त्या लहान मुलांची देखभाल करण्यासाठी तैनात असतात. तर ऑस्ट्रेलियामध्ये परिचारिकांना विशेष असे स्थान आणि महत्त्व असून शासनातील एखाद्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीप्रमाणे त्यांना मान मिळत असल्याचे अशोक घुगे यांनी यावेळी अधोरेखित केले.


ऑस्ट्रेलियात असूनही त्यांची मराठी संस्कृती आणि परंपराशी नाळ जोडलेलीच…
ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात अशोक घुगे, पत्नी कविता घुगे आणि त्यांची दुसरी पिढी मुलगा अमेय घुगे वास्तव्यास आहेत. मात्र परदेशात राहूनही घुगे कुटुंबियांनी मराठी मातीशी, मराठी संस्कृती – परंपरांशी नाळ जुळलेली आहे. मेलबर्न महाराष्ट्र मंडळातही अशोक घुगे हे तितक्याच उत्साहाने कार्यरत असून त्यांच्या घरी गणपती, दसरा, दिवाळी असे सगळे सण पारंपरिक पद्धतीने आम्ही साजरे करीत असल्याचे ते म्हणाले.


आई वडीलांचे कष्ट आणि शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनानेच इथपर्यंतचा प्रवास…
एका सामान्य कुटुंबातून येऊन थेट साता समुद्रापार आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या अशोक घुगे यांना आतापर्यंतच्या प्रवासाचे कारण विचारले असता लहानपणी पारनाका परिसरातील लोकांची लाभलेली संगत, अभिनव शाळेतील शिक्षकांचे मिळालेलं सहकार्य आणि मार्गदर्शन आणि आई वडीलांनी केलेले कष्ट, यामुळे आपला इथपर्यंतचा प्रवास शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. आई वडिलांचे आणि आपले आयुष्य सुधारायचे आहे त्यामुळे हार्डवर्कला पर्याय नाही ही गोष्ट ध्यानात ठेवून आपण प्रयत्न करत गेलो आणि आज हे स्थान प्राप्त करू शकलो अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा