Home ठळक बातम्या अभिमानास्पद : वर्ल्ड डायबेटिस परिषदेत डोंबिवलीकर आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.महेश पाटील करणार मार्गदर्शन

अभिमानास्पद : वर्ल्ड डायबेटिस परिषदेत डोंबिवलीकर आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.महेश पाटील करणार मार्गदर्शन

येत्या 7 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान थायलंडमध्ये होणार परिषद

डोंबिवली दि.3 एप्रिल :
डायबेटिस म्हणजेच मधुमेहाच्या आजाराने सध्या संपूर्ण जगाला विळखा घातला असून त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाद्वारे (International Diabetes Federation) येत्या आठवड्यात थायलंडमध्ये वर्ल्ड डायबेटिस काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या आंतरराष्ट्रीय परिषदेत डोंबिवलीतील सुप्रसिद्ध डायबेटिस रिव्हर्सल कोच आणि आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.महेश डी. पाटील हे आपल्या अभ्यास पेपरच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. (Proud moment: Dombivli Ayurveda expert Dr. Mahesh Patil will guide at the World Diabetes Conference)

येत्या 7 ते 10 एप्रिल दरम्यान थायलंडमधील बँकॉक येथे ही जागतिक डायबेटिस परिषद होणार असून त्यामध्ये जगभरातील अनेक नामवंत डायबेटिस तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. तर डोंबिवलीकर डॉ. महेश पाटील हे गेल्या 10 वर्षांपासून डायबेटिस नियंत्रणाच्या क्षेत्रात मधुमेह रिव्हर्सल कोच आणि आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

त्यांनी आतापर्यंत आयुर्वेदिक पद्धतीच्या माध्यमातून अनेक रुग्णांच्या डायबेटिस नियंत्रणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेषतः आहारातील मिलेट्स म्हणजेच बाजरीसारख्या भरड धान्यांचा समावेश, जीवनशैली, तणाव व्यवस्थापन यावर विशेष भर दिला आहे. डॉ. पाटील यांच्या अभ्यासानुसार जीवन शैलीमध्ये योग्य आहार आणि योग्य त्या सुधारणा केल्यास HbA1c चे प्रमाण किमान २% ने कमी करता येत असल्याचे सउदाहरण सिद्ध केले आहे. तसेच नव्याने मधुमेहाचे निदान झालेल्या रुग्णांसाठी हा आजार उलटविण्याची योग्य कार्यपद्धतीही त्यांनी विकसित केली असून त्याची मांडणी अभ्यास पेपरद्वारे या वर्ल्ड डायबेटिस परिषदेत केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आंतरराष्ट्रीय डायबेटिस परिषदेत डॉ. महेश पाटील यांचा सहभाग हा डोंबिवलीकरांसाठी अभिमानाचा क्षण असून त्यांच्या संशोधनाने अनेक मधुमेही रुग्णांना नवी आशा मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तर या सहभागानंतर डॉ. पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा