कल्याणात इंडियन मेडीकल असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम
कल्याण दि.5 जून :
कोवीडविरोधात गेल्या दिड वर्षांपासून लोकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या डॉक्टरांनी आता निसर्गाच्या आरोग्याचे रक्षण करण्याचा वसा घेतला आहे. इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणतर्फे सेक्रेड हार्ट शाळेच्या मदतीने आजच्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तब्बल 180 वृक्षांची लागवड केली. कल्याणजवळील नामांकित सेक्रेड हार्ट शाळेला लागून असणाऱ्या वनजमिनीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमूख उपस्थितीत हे वृक्षारोपण करण्यात आले.
कोवीड आल्यापासून संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी अथकपणे काम करत आहेत. कोवीडशी लढता लढता पर्यावरण आणि त्याच्या रक्षणाचे महत्वही चांगलेच अधोरेखित झालेले पाहायला मिळाले. त्यामुळेच लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे दूत आता निसर्गाच्या आरोग्याचे बिघडलेले संतुलन ठिक करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. कल्याणजवळील वनक्षेत्राच्या जागेवर अधिकाधिक ऑक्सिजन देणारे 180 वृक्ष आयएमए कल्याण आणि सेक्रेड हार्ट शाळेकडून लावण्यात आले. विशेष म्हणजे या प्रत्येक वृक्षाला संबंधित व्यक्तीच्या नावाची पाटी लावण्यात आली असून दर 3 महिन्यांनी त्या त्या वृक्षाच्या झालेल्या वाढीचे फोटो प्रत्येकाला पाठवले जाणार असल्याचे डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले. तर कोरोनाच्या काळात लोकांची सेवा करताना मृत्युमुखी पडलेल्या कल्याणातील आयएमएचे डॉ. पराग पाटील यांच्या स्मरणार्थ आणि श्रद्धांजली म्हणून याठिकाणी एक वृक्ष लावण्यात आला आहे.
यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, सेक्रेड हार्ट शाळेचे प्रमूख एलबिन अँथनी, इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे सेक्रेटरी डॉ. इशा पानसरे, खजिनदार डॉ. सुरेखा इटकर, डॉ. हर्षल निमखंडे यांच्यासह अनेक डॉक्टर मंडळींनी उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला.