अधिकचा भरलेला कर आगामी करात समाविष्ट करण्याची मागणी
कल्याण ग्रामीण दि. 30 ऑक्टोबर:
पलावा गृहप्रकल्पातील नागरिकांच्या मालमत्ता करात ६६% सवलत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत मालमत्ता करापोटी भरलेली अधिकची रक्कम समायोजित करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. (Property tax relief for Palava residents; Thanks to the Chief Minister from MNS MLA Raju Patil)
पलावा मेगासिटी टाऊनशिपला आयटीपी प्रकल्पाअंतर्गत परवानगी देण्यात आली आहे. या प्रकल्पातील नागरिकांना ज्या प्राथमिक गरजा आहेत, ज्या पुरवायच्या आहेत त्या संबंधित उद्योजकाने देणे आवश्यक असते. त्यानुसार त्यांना मालमत्ता करामध्ये ६६% सवलत दिली जाते. ही सवलत देण्याची मागणी आपण यापूर्वीच राज्य सरकारकडे केल्याचे मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी सांगितले. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वात आधी पाठपुरावा केल्याचेही आमदार पाटील म्हणाले.
या निर्णयावर नेमके काय म्हणाले आमदार राजू पाटील…
महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात २० नोव्हेंबर २०१८ रोजी आयटीपी प्रकल्पामधील नागरिकांना मालमत्ता करात ६६ % सवलत देण्याचे परिपत्रक सरकारने काढले होते. मात्र या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नव्हती. आपण महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. कारण ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भाऊसाहेब दांगडे कार्यरत असतांना त्यांनी खोणी पलावा येथील नागरिकांना मालमत्ता करात सवलत दिल्याचे आमदार पाटील म्हणाले.
तसेच यासंदर्भात महापालिकेचे आधीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडेही आपण वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र निर्णय घेण्याआधीच त्यांची बदली झाली. त्यानंतर यासंदर्भात २० जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आणि या पत्राची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे राजू पाटील म्हणाले. आयुक्तांनी यासंदर्भात अहवाल सादर करण्यास दिरंगाई केली तरीही मुख्यमंत्र्यांनी आपल्या जनहित मागणीचा आदर करीत नागरिकांना ६६ % मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन. नागरिकांनी जो अधिकचा कर भरला आहे तो आगामी मालमत्ता करात समायोजित करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.