कल्याणात एमसीएचआय प्रॉपर्टी एक्स्पोला दिली भेट
कल्याण दि.८ एप्रिल :
काही लोक म्हणतात आम्ही दिल्लीला जातो, दिल्लीला जातो. मात्र दिल्लीला जाऊन आम्ही राज्याच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये आणतो. मागील अडीच वर्षांत केवळ अहंकारामुळे हजारो कोटींचे प्रकल्प रखडले आणि सर्वसामान्यांना त्याचा भुर्दंड सोसावा लागला अशा शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला. (In those two and a half years, projects worth thousands of crores were stalled due to arrogance – Chief Minister Eknath Shinde)
कल्याणात सुरू असणाऱ्या १२ व्या एमसीएचआय क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोला त्यांनी शुक्रवारी भेट दिली. त्यावेळी राज्यातील विकास प्रकल्प, त्यांची गती, कल्याण डोंबिवलीचा विकास, इथले भविष्यातील प्रकल्प यांचा उल्लेख करण्यासह नाव न घेता आपल्या विरोधकांचाही समाचार घेतला.
अडीच वर्षांमध्ये बंद पडलेले प्रकल्प आम्ही वेगाने सुरू केले…
राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. आणि जेव्हा ही इच्चशक्ती असते तेव्हाच मोठी कामं आपण करू शकतो. त्यामुळेच गेल्या अडीच वर्षांमध्ये बंद पडलेले प्रकल्प आम्ही निर्णय घेऊन आणि त्यातील अडथळे दूर करून वेगाने सुरू केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा एकाच विचाराचे असते तेव्हा राज्यांचा देखील विकास होत असतो. आणि म्हणून या राज्याच्या विकासासाठी आम्ही दिल्लीला जातो. त्यासाठी आमच्या डोक्यात कोणताही अहंकार नसल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
कल्याण डोंबिवली शहरांसह परिसरात पायाभूत प्रकल्पांची कामे…
कल्याण डोंबिवली ही दोन्ही शहर वाढत आहेत आणि या वाढत्या शहरांच्या गरजाही वाढत्या आहेत. त्या विचारात घेऊन आज कल्याण डोंबिवली परिसरात पायाभूत सुविधांच्या विकासाचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. पूर्णत्वास येणारा मोठा गाव माणकोली पुल, रिंग रोड, ऐरोली – काटई एलिव्हेटेड मार्ग, रिंग रोड प्रकल्प, कल्याण पडघा आठ पदरी रस्ता, त्याशेजारून जाणारा मुंबई – नागपूर समृद्धी महामार्ग, खडक पाडामार्गे उल्हासनगर पर्यंत मेट्रो, शिळफाटा ते रांजणोली एलिव्हेटेड रोड, यासारख्या अनेक प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. ज्यामुळे कल्याण डोंबिवली शहरांमधून मुंबईसह राज्याच्या इतर महत्वाच्या भागासाठी कनेक्टिव्हिटी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कचऱ्याचा डोंगर साफ करा आणि तिकडे मोठे गार्डन करा…
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणच्या आधारवाडी डंपिंग ग्राउंडचा उल्लेख करत तो साफ करून त्याठिकाणी मोठे गार्डन करा. तिथे बिल्डिंग वगैरे बांधू नका अशा सूचना त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना केली. बाहेरून कल्याणात आल्यावर कचऱ्याचा मोठा डोंगर दिसतो तो साफ करून याठिकाणी मोठे गार्डन केल्यास लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल. तर एमसीएचआयमधील बांधकाम व्यावसायिकांनी मुंबई ठाण्याच्या धर्तीवर केडीएमसी प्रशासनाला सहकार्य करा. शासनाकडून जे काही हवंय ते आम्ही सर्व करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, एमसीएचआय क्रेडाईचे राजन बांदेलकर, एम सी एच आय कल्याण डोंबिवलीचे माजी अध्यक्ष रवी पाटील यांच्यासह मिलिंद चव्हाण, सुनिल चव्हाण आदी मान्यवर बांधकाम व्यावसायिकही उपस्थित होते.