कल्याण दि.9 जानेवारी :
कल्याणातील नामांकित बिर्ला महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक किशोर देसाई यांनी नुकतीच मुंबई युनिव्हर्सिटीकडून बायोटेक्नॉलॉजी विषयातील पीएचडी (Ph.D) पदवी प्राप्त झाली आहे. (Prof. Kishore Desai of Birla College awarded Ph.D by Mumbai University)
किशोर देसाई यांनी बायोटेक्नॉलॉजीमध्ये क्षयरोग (TB) आजाराच्या औषध प्रतिरोधक (MDR & XDR TB) जिवाणूच्या जनुकांवर (Bio Genetics) संशोधन केले आहे. देसाई यांचे हे संशोधन जागतिक आणि भारतीय संशोधन मासिकांमध्येही प्रकाशित झाले आहे. तसेच अनेक जागतिक आणि भारतीय संशोधन परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत.
संपूर्ण जगभरात क्षयरोग (TB) हा आजार जिवाणू संसर्गित मृत्यूंचे पहिले कारण आहे. तर भारतामध्ये क्षयरोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या ध्यासानुसार भारतातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचा त्यांचा मानस असून याच ध्यासाने प्रेरित होऊन आपण या विषयाची निवड केली असल्याची माहिती किशोर देसाई यांनी एलएनएनशी बोलताना दिली आहे. या संशोधनासाठी प्रा. किशोर देसाई यांना बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांचे सखोल मार्गदर्शन लाभले आहे.
दरम्यान या गंभीर आणि तितक्याच महत्त्वपूर्ण विषयावरील संशोधनासाठी मिळवलेल्या पीएचडीबद्दल बिर्ला महाविद्यालयाचे संचालक (शिक्षण) डॉ. नरेश चंद्र यांनी डॉ. देसाई यांचे विशेष अभिनंदन केले आहे.