Home ठळक बातम्या वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कल्याणात खासगी कंपनीच्या बसचे मार्ग बदलले; असा आहे नविन...

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कल्याणात खासगी कंपनीच्या बसचे मार्ग बदलले; असा आहे नविन मार्ग

 

कल्याण दि.31 ऑगस्ट :
कल्याण पश्चिमेला संध्याकाळच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कल्याण शहर वाहतूक पोलिसांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कल्याणात कर्मचाऱ्यांना न्यायला आणि सोडायला येणाऱ्या खासगी कंपनीच्या बसचे मार्ग बदलण्यात आले असून गेल्या काही दिवसांपासून या महत्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. परिणामी कल्याण पश्चिमेत मुख्य रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडी बहुतांशी कमी झाल्याचे दिसत आहे.

प्रचंड मोठ्या संख्येने वाढलेली वाहने आणि या वाहन संख्येला सामावून घेण्यासाठी अपुऱ्या पडणाऱ्या अरुंद रस्त्यांमुळे आधीच कल्याण पश्चिमेत मुख्य रस्ते नेहमीच गजबजलेले दिसतात. हे कमी म्हणून की काय गेल्या काही वर्षांपासून अनेक खासगी कंपनीच्या बसेस आपल्या कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी सकाळ- संध्याकाळ कल्याण पश्चिमेच्या मुख्य रस्त्यावर धावत असतात. गुरुदेव हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, लालचौकी या प्रमूख चौकात थांबत थांबत या खासगी बसेस जात असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. तर स्टेशन परिसरात सुरू असणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामामुळेही स्टेशन परिसर आणि बैल बाजार परिसरात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. परिणामी अनेकदा कल्याण पश्चिमेच्या पत्रीपुलापासून ते दुर्गाडी पुलापर्यंतच्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. संध्याकाळच्या वेळेस तर या मार्गावर चालण्यासाठीही जागा नसते. तर ही वाहतूक सुरळीत करता करता वाहतूक पोलिसांच्या नाकी अक्षरशः नऊ येत होते.

त्यावर उपाय म्हणून आता कल्याण शहर वाहतूक पोलीसांनी आता या कंपनीच्या खासगी बसेसना कल्याण पश्चिमेला आग्रा रोडवर येण्यास संध्याकाळी 6 ते रात्री 9 या गर्दीच्या वेळेत ‘नो एंट्री’ केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिली. या निर्णयाचे गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक परिणाम दिसत असून दुर्गाडी ते बैल बाजार मार्गावरील वाहतूक बऱ्याच अंशी सुरळीत झाल्याचेही त्यांनी सांगितले.

खासगी कंपनीच्या बसेससाठी असा आहे नविन मार्ग…

पर्याय क्रमांक 1 – भिवंडीवरून दुर्गाडीमार्गे येणाऱ्या बसेस गोविंदवाडी बायपासमार्गे पत्रीपुल, एपीएमसी मार्केटजवळील शहनाई हॉल इथे आपले कर्मचारी उतरवणार…

पर्याय क्रमांक 2 – पडघ्यावरून येणाऱ्या बसेस आधारवाडी चौक, वाडेघर, दुर्गाडीमार्गे गोविंदवाडी पत्रीपूल, एपीएमसी मार्केट आणि शहनाई हॉल इथे आपले कर्मचारी उतरवू शकतील.

पर्याय क्रमांक 3 – विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरकडे जाणाऱ्या बसेसना 2 मार्ग देण्यात आले आहेत. त्यापैकी 1ला बिर्ला कॉलेजमार्गे शहाड आणि यु टर्न घेऊन चोपडा कोर्टमार्गे पुढे जाऊ शकतील..
तर दुसरा मार्ग विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या बसेसना पत्रीपुल, चक्कीनाका, श्रीराम चौक होऊन इच्छित स्थळी जाता येईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा