पोलीस हवालदार सुरेश पाटील यांचे होतेय कौतुक
कल्याण दि.21 डिसेंबर :
मद्यधुंद अवस्थेत 26 शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला कल्याणातील वाहतूक पोलीस हवालदार सुरेश पाटील यांनी वेळीच रोखल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. शुक्रवारी रात्री कल्याण पश्चिमेतील सुभाष चौकामध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी बस चालकावर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई केली आहे. (Private bus driven under the influence of alcohol; A major accident was averted due to the alertness of the traffic police)
उल्हासनगरच्या जग्गू फुटबॉल अकादमीचे 26 शालेय विद्यार्थी फुटबॉल स्पर्धेसाठी विरारला निघाले होते. उल्हासनगरवरून ही बस वालधुनी उड्डाणपूल ओलांडून सुभाष चौकामध्ये पोहोचली. मात्र वळण घेताना ही बस अधिक प्रमाणात वेडी वाकडी येत असल्याचे पोलीस हवालदार सुरेश पाटील यांच्या निदर्शनास आले. आणि पाटील यांनीही क्षणाचाही विलंब न करता पुढे जाऊन लगेचच ही बस थांबवली.
बस वेडी वाकडी चालवत असल्याबाबत संबंधित बस चालकाला विचारणा केली असता त्याच्या बोलण्यावरून त्याने मद्यपान केल्याचा संशय पाटील यांना आला. त्याची ब्रेथ ॲनलायझर चाचणी केली असता त्याने मद्यप्राशन केलं असल्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी तातडीने ही बस आपल्या ताब्यात घेत त्यातील विद्यार्थ्यांना खाली उतरवले. आणि त्यांना बस चालक मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचे सांगत त्यांना आपापल्या घरी जाण्यासाठी वाहनाची सुविधा करून दिली.
याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी बस चालक सुरेंद्र प्रसाद गौतम याच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हअंतर्गत कारवाई करत दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली आहे. तर वाहतूक पोलीस हवालदार सुरेश पाटील यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून या कामगिरीबद्दल पाटील यांचे कौतुक केलं जात आहे.