
केडीएमसीच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
कल्याण दि.8 एप्रिल :
पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा झालेल्या मृत्यूची घटना ताजी असतानाच केडीएमसीच्या प्रसुती रुग्णालयातही एका दोन महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला असून केडीएमसी प्रशासनाने मात्र तो फेटाळून लावला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम रुग्णालयात कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनसाठी या महिलेला दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. शांतीदेवी मौर्या (३०)असे या महिलेचे नाव असून ती कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात कुटुंबासह राहत होती. चार दिवसापूर्वी म्हणजेच शुक्रवारी पासून तिच्या पोटात दुखत असल्याने तिला नजीकच्या कोळसेवाडी परिसरातील केडीएमसीच्या शक्तीधाम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यापासून तिची प्रकृती खराब असल्याने तिला रक्तही चढविण्यात आले होते. दरम्यान प्रकृती सुधारल्याने सोमवारी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र काही वेळातच अचानकपणे तिची प्रकृती खालावली. त्यांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. मात्र, रुग्णवाहिका रस्त्यात असताना शांतीदेवी मौर्या यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर केडीएमसी प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
शांतीदेवी यांच्या पतीने सांगितले की आपल्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने किडनी स्टोन असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. या ठिकाणी किडनी स्टोनचे ऑपरेशन केले जाईल असे सांगून या रुग्णालयात शांतीदेवीला शुक्रवारी ऑपरेशनसाठी दाखल करण्यात आले होते.
केडीएमसी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली ही माहिती…
ही महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आली होती. ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. त्रास वाढल्यानंतर या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार खासगी रुग्णालयात उपचारसाठी नेले असताना त्यांचा मृत्यू झाल्याची प्रतिक्रिया केडीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ल यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान या महिलेच्या पतीने दिलेली माहिती आणि केडीएसमी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती यामध्ये मोठी तफावत आढळून आली असून दोघांच्याही भूमिकांनी वेगळेच प्रश्न निर्माण झाले आहेत.