कल्याण डोंबिवली दि.17 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली उदंचन आणि मोहिली जलशुध्दीकरण केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिनीत बिघाड झाला आहे. ज्याचा परिणाम कल्याण डोंबिवलीच्या पाणी पुरवठ्यावर झाला असून बिघाड दुरुस्त होईपर्यंत कल्याण डोंबिवलीतील अनेक भागात पाणी येणार नसल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. (Power line failure: There is no water in these parts of Kalyan Dombivli)
महावितरणमार्फत टाटा पॉवर कांबा सबस्टेशन येथुन मोहिली उदंचन आणि मोहिली जलशुध्दीकरण केंद्राला विद्युत पुरवठा केला जातो. मात्र या वीज वाहिनीमध्ये आज सकाळी बिघाड झाल्याने मोहिली उदंचन आणि मोहिली जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. हा तांत्रिक बिघाड शोधून दुरुस्तीचे काम महावितरणमार्फत सुरू असून हे काम पूर्ण होऊन विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत केडीएमसीच्या कल्याण डोंबिवलीतील पुढील भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या भागात पाणी येणार नाही….
महापालिकेच्या मोहिली आणि नेतिवली जलशुध्दीकरण केंद्रामधून कल्याण (ग्रामिण) आणि डोंबिवली (पूर्व व पश्चिम) तसेच कल्याण पश्चिम/पूर्व विभागामधील भोईरवाडी, शहाड, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, अशोक नगर, वालधुनी, शिवाजी नगर, जोशी बाग, बिर्ला कॉलेज ते खडकपाडा रोड आणि कल्याण स्टेशन परिसर या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसी पाणी पुरवठा खात्यातर्फे करण्यात आले आहे.