मुंबई, दि.14 सप्टेंबर :
विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे पीए रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले. म्हात्रे हे पैसे घेऊन पदे विकत असल्याचा आरोप संजय शिरसाट, निरुपम आणि शेलार यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Position with money? : Shiv Sena Shinde faction – BJP makes serious allegations)
गेल्या पंधरा-वीस वर्षात ज्या – ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली त्या सर्वांनीच शिवसेनेत खास करून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नजीकच्या लोकांकडून निवडणुकीत पैसे घेऊन तिकीट विकले जात असल्याचे आरोप केलेले आहेत. यात नारायण राणेंपासून तर राज ठाकरे या अनेक नेत्यांचा समावेश आहे. पैसे घेऊन विधानसभेचे किंवा महापालिकेचे तिकीट दिले जाते, असे आरोप करूनच राज ठाकरेही बाहेर पडले होते. या सर्व नेत्यांच्या रडारवर खासकरून उद्धव ठाकरे हे होते.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि विरोधकांना अंगावर घेत शिवसेनेचा किल्ला लढवत असलेले संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी अत्यंत गंभीर आरोप केला. त्यांनी थेटच रवी म्हात्रे आणि विनायक राऊत या दोघांचा नामोल्लेख केला आहे. विनायक राऊत हे उद्धव सेनेचे सचिव आहेत तर रवी म्हात्रे हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आहेत.
संजय शिरसाट यांनी आरोप केला की विनायक राऊत यांच्या मदतीने रवी म्हात्रे हे पैसे घेऊन पक्षातील लोकांना पदे विकत आहेत. ‘पैसे आणा आणि पदे घ्या’ ही कार्यपद्धती सध्या सुरू असल्याचा आरोप केला आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनीही शिरसाट यांच्या आरोपांची पुष्टी केली. निरुपम यांनी आरोप केला की, उबाठा पैसे घेऊन काँग्रेस आणि शरद पवारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजपचे आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही शिवसेनेच्या दाव्याला समर्थन दिले. पैसे दो पैसे लो याच कामासाठी विनायक राऊत आणि रवी म्हात्रे पूर्वीपासून प्रसिद्ध असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.
दरम्यान शिरसाट यांच्या या आरोपाला अद्याप तरी उद्धव सेनेकडून कोणीही प्रत्युत्तर दिलेले नाही.