डोंबिवली दि.14 मे :
आपल्याकडे कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रही भरडले गेले असून ऑनलाइन शिक्षणामुळे गरीब वर्गातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अनेकांकडे स्मार्टफोन, मोबाइल रिचार्ज, शैक्षणिक साहित्य घेण्याचेही पैसे नसल्याने हे गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. या विद्यार्थ्यांची नाळ शिक्षणापासून तुटू नये यासाठी प्रांगण फांऊडेशन संस्थेने पुढाकार घेतला आहे.
या संस्थेच्या माधमातून गरीब वस्तीतील विद्यार्थ्यांना स्मार्टफोन उपलब्ध करून देणे, मोबाइलला रिचार्ज करून देणे, अन्नधान्य पुरवणे, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलणे असे नानाविध उपक्रम प्रांगण फांऊडेशनमार्फत गेल्या 2 वर्षांपासून ‘प्रोजेक्ट चंचलमन’च्या माध्यमातून राबवत आहे.
डोंबिवलीतील ९ तरुण आणि त्यांच्या काही मित्रमंडळींनी एकत्र येत २०१८ मध्ये ‘प्रांगण फांऊडेशन’ची स्थापना केली. सुरुवातीला कल्याण-डोंबिवली येथील गरीब वस्त्यांमध्ये जाऊन अन्न पुरवले जायचे. तसेच दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याच्या उपक्रमाचा संस्थेने शुभारंभ केला. सध्या करोनाच्या काळात अनेक संकट आली असली, तरी संस्थेतील सदस्य तन-मन-धनाने गरीब विद्यार्थ्यांच्या मनात चैतन्य फुलवत आहे. या संस्थेचे १५० ते २०० सदस्य हे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास वर्ग, इंग्रजी शिकवणी घेण्यापासून शिक्षण साहित्य पुरवण्याचे काम मोठ्या जिद्दीने करत आहेत.
संस्थेमार्फत रावबत असलेल्या या उपक्रमाचा लाभ मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही माध्यमांचे विद्यार्थी घेत आहे.’गरीब घरातील विद्यार्थी स्पर्धामय युगात पुढे जावा, त्यांच्या मनातील इंग्रजीबद्दलचा न्यूनगंड नाहीसा व्हावा, कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, यासाठी ‘प्रांगण’ झटत असून तरुणांनी या उपक्रमात सहभागी होऊन समाजाला दिशा देण्याचे आवाहन प्रांगण फांऊडेशनने केले आहे. प्रांगण फांऊडेशन संस्थेने २०१८ साली सुरु केलेल्या ‘प्रोजेक्ट चंचलमन’ या उपक्रमातून गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा मानस डोळ्यापुढे ठेवला होता. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांची इंग्रजी बद्दलची भीती दूर झाली आहे.
या उपक्रमात वैभव नरेंद्र पाटील, तन्मय मुलगुंड, अक्षय हंचाटे, चार्मी विच्छिवोरा, राहुल देशपांडे, आशीष पुजारी, स्वप्निल सरफरे, हेतवी विच्छिवोरा आणि सागरिका अय्यर या सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून आजही यशस्वीपणे रावबत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक संस्था किंवा व्यक्तींनी pranganfoundationindia@gmail.com या इमेल किंवा 77180 71289 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.