Home कोरोना रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

 

डोंबिवली दि.13 मार्च :
कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्ण प्रचंड वाढल्याने केडीएमसीकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यात दुकाने आणि हॉटेल-बार बंद करण्याची एक वेळ निश्चित करण्यात आली असली तरीही त्यापेक्षा जास्त वेळ डान्सबार सुरू असल्याचे एका व्हायरल व्हिडीओवरून समोर आले आहे. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी संबंधित बार व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण डोंबिवलीमध्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामध्ये अत्यावश्यक सेवांची वगळता इतर दुकाने संध्याकाळी 7 वाजता बंद करण्याचे निर्बंध आहेत. तर हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बारला रात्री 11 वाजेपर्यंत बंद करण्याचे निर्बंध आहेत. त्यानूसार कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून कार्यवाही सुरू असून संध्याकाळी 7 वाजता दुकाने बंद केली जात आहेत. तर निर्बंधांमधील नियमानुसार हॉटेल्स-रेस्टॉरंट आणि बार रात्री 11 वाजता बंद करण्याची वेळ असतानाही डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात असणारा इगो डान्सबार चक्क रात्री साडेबारापर्यंत सुरू असल्याची धक्कादायक बाब एका व्हायरल व्हिडीओतून समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी या डान्सबारच्या व्यवस्थापकावर कोवीड प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांनी दिली आहे.

दरम्यान आधीच दुकाने बंद करण्याच्या देण्यात आलेल्या असमान वेळेवरून कल्याण डोंबिवलीतील दुकानदार आणि व्यापारी वर्ग नाराज आहे. त्यात दुकानांपेक्षा वाढीव वेळ देऊनही हॉटेल आणि बारचालकांकडून या नियमांचे उल्लंघन होत असेल तर मग अशा निर्बंधांचा काय उपयोग? तर दुकानदारांना वेळेत दुकाने बंद करण्याची सक्ती आणि हॉटेल्स-डान्सबारवर मात्र मेहेरबानी का? असा संतप्त सवाल दुकानदारांकडून विचारला जात आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा