कल्याण- डोंबिवली दि.31 डिसेंबर :
जुने वर्ष संपायला आणि नविन वर्ष सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे या नव्या वर्षाचे जोरदार स्वागत करण्यासाठी अनेकांनी तयारी केली आहे. मात्र या थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या नावाखाली इतरांना त्रास होईल अशा प्रकारे धांगडधिंगा कराल तर मग तुमची काही खैर नाही. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशन दरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केली असून कल्याण डोंबिवलीत ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. तसेच न्यू इयर सेलिब्रेशनदरम्यान अति उत्साहात होणारी संभावित गैरकृत्य टाळण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने नजर ठेवली जाणार असल्याची माहिती पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे. (Kalyan Dombivalikar has planned the 31st celebration, then the police has given this important information)
60 टक्के पोलीस अधिकारी कर्मचारी आज रस्त्यावर…
यंदा न्यू इयर सेलिब्रेशन आणि त्यात रविवारच्या सुट्टीचा दिवस आल्याने कल्याण डोंबिवलीतील महत्त्वाच्या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच रात्रीच्या वेळेतही मोठ्या संख्येने लोकं बाहेर पडू शकतात. त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कल्याण डोंबिवलीतील पोलीस सज्ज झाले आहेत. कल्याण आणि डोंबिवली या ठाणे पोलिसांच्या परिमंडळ 3 मध्ये तब्बल 60 टक्के पोलीस अधिकारी कर्मचारी आज रस्त्यावर उतरणार असल्याचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.
महिलांसाठी दामिनी आणि छेडछाड विरोधी पथके नियुक्त…
आजच्या रात्री कल्याण डोंबिवली शहरातील महत्वाचे चौक, रस्ते, मैदाने, गर्दी जमा होणारी ठिकाणे या भागात पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त, मोबाईल गस्त असणार आहे. तसेच शहरामध्ये येण्याच्या आणि बाहेर जाण्याच्या मार्गावर नाकाबंदी केली जाणार आहे. विशेषतः महिला आणि मुलींची छेडछाड, विनयभंग, चैन- मोबाईल खेचून नेणे आदी प्रकार रोखण्यासाठी खास दामिनी आणि छेडछाड विरोधी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
सर्व प्रवेशद्वारावर विशेष नाकाबंदी…
तर वाहतुक पोलिसांकडून शहरातील सर्व प्रवेशद्वारावर विशेष नाकाबंदी केली जाणार असून ब्रेथ ॲनलायझरच्या माध्यमातुन मद्यपी वाहन चालकांविरोधात ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली जाणार आहे. यासोबतचशहरात ऑल आऊट मोहिमेद्वारे हद्दपार, पाहिजे असलेल्या आरोपींविरोधात सुरू असलेली कारवाईही कायम ठेवली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने स्वागत करा…
त्यामूळे लोकांनी नववर्षाचे कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने आनंदाने स्वागत करावे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी यावेळी केले आहे. या पत्रकार परिषदेला कल्याण परिमंडळ 3 चे डी सी पी सचिन गुंजाळ हेदेखील उपस्थित होते.