केडीएमसी, स्मार्ट सिटी,पोलीस अधिकाऱ्यांसह केली पाहणी
कल्याण दि.7 ऑगस्ट :
गणपती बाप्पा येण्यासाठी बरोबर एक महिना उरला असून त्यापूर्वीच कल्याणच्या दुर्गाडी गणेश घाटावर येण्या जाण्याच्या रस्त्यासह इतर आवश्यक सुविधांचे नियोजन करण्याची मागणी शिवसेना कल्याण शहरप्रमुख रवी पाटील यांनी केली आहे. रवी पाटील यांनी आज केडीएमसी शहर अभियंता, स्मार्ट सिटी विभाग, शहर पोलिसांसह वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांसमवेत गणेश घाट परिसराची पाहणी केली. (Plan the access road to and from Durgadi Ganesh Ghat and other facilities – City Chief Ravi Patil’s demand)
येत्या 7 सप्टेंबर रोजी गणेश उत्सवाला प्रारंभ होत असून त्याला बरोबर एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. दुर्गाडी गणेश घाट परिसरात केवळ कल्याण पश्चिमेतीलच नव्हे तर उल्हासनगरमधूनही मोठ्या संख्येने भाविक गणेश विसर्जनासाठी येत असतात. परंतु दुर्गाडी गणेश घाट परिसरात सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत नौदल संग्रहालयाचे काम सुरू आहे. त्यामुळे दुर्गाडी गणेश घाट परिसरात केवळ एकच मार्गिका उपलब्ध असून दुसऱ्या बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. ज्याचा मोठा परिणाम गणेश विसर्जनसाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या येण्या जाण्यावर होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
ही बाब शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, स्मार्ट सिटीचे संदीप तांबे, अभियंता सोनवणे, खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केंचे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक शिरसाठ आदी प्रमूख अधिकाऱ्यांसमवेत या भागाची पाहणी केली. तसेच याठिकाणी पूर्वीप्रमाणेच येण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी मार्गाची योग्य ती सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही रवी पाटील यांनी यावेळी केली. तर गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठीही आपण केडीएमसी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. पाऊस थांबल्यानंतर शहरातील हे रस्ते सुस्थितीत आणले जातील. आणि नविन रस्ते बनवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी उपस्थित केडीएमसी अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यासह इतर आवश्यक सोयी सुविधाही उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
या भेटीवेळी माजी नगरसेवक अरविंद पोटे,विभागप्रमुख अनंता पगार,उपविभागप्रमुख अजय हिरवे,युवासेना कल्याण शहर प्रमुख पश्चिम सुजित रोकडे,उपशहरप्रमुख अनिरुद्ध पाटील,गटप्रमुख सुनील वाघ,युवासैनिक विनायक भोसले,सोहम बेनकर आदी उपस्थित होते.