Home ठळक बातम्या नयनरम्य ‘प्रकाशोत्सवा’ने उजळून निघाला डोंबिवलीचा फडके रोड

नयनरम्य ‘प्रकाशोत्सवा’ने उजळून निघाला डोंबिवलीचा फडके रोड

 

डोंबिवली दि.2 नोव्हेंबर :
गेल्या दिड पावणे दोन वर्षांपासून कोरोनाच्या काजळीने झाकोळून गेलेला डोंबिवलीचा फडके रोड आज लख्ख प्रकाशात उजळून निघालेला पाहायला मिळाला. निमित्त होते दिपावलीचे औचित्य साधून डोंबिवली शहर मनसेने आयोजित केलेल्या मनसेच्या ‘प्रकाश उत्सव’ पर्वाचे. कोरोनामुळे आलेली मरगळ झटकण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील आणि डोंबिवली शहर मनसेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

फडके रोड. सांस्कृतिक डोंबिवलीची तितकीच ठळक अशी सांस्कृतिक ओळख म्हणूनही हा फडके रोड सुपरिचित आहे. आणि त्यातही दिवाळी म्हटली की फडके रोडचा दिमाख काही औरच. जागोजागी काढण्यात आलेल्या सुंदर आणि सुबक रांगोळ्या, ढोल ताशांचा गजर आणि सळसळून वाहणारा तरुणाईचा उत्साह म्हटलं की डोंबिवलीचा हा फडके रोडच डोळ्यासमोर उभा राहतो. केवळ प्रत्येक डोंबिवलीकराच्या मनात ‘फडके रोड’ची एक स्पेशल अशी जागा आहे.

 

तर कोरोनामुळे डोंबिवलीची सांस्कृतिक ओळख आणि तरूणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या या फडके रोडची ‘रया’ लयास गेली होती. मात्र मनसेच्या या दिपोत्सवाने कोरोनामूळे आलेली ही काजळी आणि पूर्वीचा डौल प्राप्त होण्याचा श्रीगणेशा झालेला पाहायला मिळाला. आणि या नयनरम्य अशा उपक्रमाची आठवण मोबाईलच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये साचवण्यासाठी झाली नसती तर नवल. तरुण वर्गापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील डोंबिवलीकर हा अद्भुत आणि नेत्रदीपक सोहळा आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यात व्यस्त असल्याचे यावेळी दिसून आले.

गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे आपल्याला सणही व्यवस्थित साजरे करता येत नव्हते. फडके रोड आणि आप्पा दातार चौक याठिकाणी दिवाळी काळात तरूणाईची लाट येते. डोंबिवलीसाठी या फडके रोडचे सांस्कृतिकदृष्ट्या वेगळे महत्व असून यंदा कोणत्याही संस्थेतर्फे याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. या पार्श्वभूमीवर आम्ही पुढाकार घेऊन मनसेतर्फे हा उपक्रम राबविल्याची प्रतिक्रिया आमदार राजू पाटील यांनी दिली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा