कल्याण दि.25 ऑक्टोबर :
कल्याण पश्चिमेतील मल्हार नगर परिसरात असणाऱ्या जरीमरी नाल्यावर आता पादचारी पूल बांधण्यात येणार असल्याने स्थानिकांना मोठा फायदा होणार आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून हा पादचारी पूल बांधण्यात येणार असून दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. या पादचारी पुलामुळे संतोषी माता रोड, जोशीबाग, मल्हार नगर, काळा तलाव आदी परिसरातून स्टेशनला जाणाऱ्यांच्या वेळेत आणि त्रासात मोठी बचत होणार आहे.
कल्याण पश्चिमेच्या मल्हार नगर परिसर, आचिव्हर्स कॉलेजच्या पाठीमागे हा पूल बांधण्यात येणार आहे. येथील स्थानिक रहिवाशांसह त्याच्या आजूबाजूच्या भागातून स्टेशनला जाणाऱ्यांचा मोठा त्रास वाचणार आहे. या पुलाअभावी स्टेशनकडे जाणाऱ्या लोकांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी सध्याचा मार्ग काहीसा असुरक्षित असल्याने याठिकाणी पादचारी पूल बांधण्याची नितांत गरज होती. पावसाळ्याच्या काळात तर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ये – जा करण्यासाठी अनेक अडचणी आणि गैरसोयींचा सामना करावा लागायचा. त्यामुळे स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी श्रेयस समेळ यांनी या जरीमरी नाल्यावर पादचारी पूल बांधण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार आमदार भोईर यांनी आपल्या आमदार निधीतून या पादचारी पुलाला निधी उपलब्ध करुन दिला.
त्यानुसार दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदार विश्वनाथ भोईर, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या हस्ते या पादचारी पुलाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी श्रेयस समेळ, अचिव्हार्स कॉलेजचे महेश भिवंडीकर सर आदी मान्यवर उपस्थितीत होते.
दरम्यान स्टेशनला जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने हा पादचारी पूल महत्त्वाचा दुवा ठरेल. आणि लोकांच्या वेळेत त्यामुळे नक्कीच बचत होईल असा विश्वास यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे. तर या कामाचे भूमीपूजन झाल्याने स्थानिक रहिवाशांनी आमदार विश्वनाथ भोईर यांचे आभार मानले आहेत.