
कल्याण दि.14 जानेवारी :
एकीकडे मोबाईलमुळे वाचनाची कमी झालेली सवय पुन्हा रुजवण्यासाठी आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी कल्याणच्या के.एम. अग्रवाल महाविद्यालयात अनोखा वाचन उपक्रम राबवण्यात आला. ज्यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापकांसह विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ( A unique reading initiative took place in Kalyan’s Agarwal College)
मोबाईलच्या केवळ वापराचे नव्हे तर अतिवापराचे अनेक दुष्परिणाम दिसू लागले आहेत. ज्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि त्याचसोबत सामाजिक धोकेही समोर येऊ लागले आहेत. या सामाजिक धोक्यांपैकीच एक आणि सर्वात महत्त्वाचा असणारा म्हणजे लोकांचे कमी झालेलं वाचन आणि परिणामी लोप पावत चाललेली आपली वाचन संस्कृती. आपल्या समाजाच्या प्रगल्भतेला, विचारांना योग्य ती दिशा देण्याचे काम आतापर्यंत या वाचन संस्कृतीने केले आहे. मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या प्रचंड रेट्यात ही वाचनाची आवड आणि संस्कृती काहीशी घसरली आहे.
नेमका हाच धागा पकडून कल्याणातील के. एम. अग्रवाल महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत प्राध्यापक आणि अनेक विद्यार्थ्यांचा सामूहिक वाचन उपक्रम राबवण्यात आला. ज्यामध्ये अग्रवाल महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेची अनेक नामांकित लेखकांची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. अग्रवाल महाविद्यालयातील एफ.वाय, एस.वाय, टी.वायचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, सेल्फ फायनान्स विषयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. सतत मोबाईल फोन वापरणारी ही युवा पिढी आज पुस्तक वाचानांमध्ये एकदम दंग झाली होती.
पुस्तक वाचनाचा हा आनंद खरोखर अतिशय निर्मळ असल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिली. तर विद्यार्थ्यांमध्ये ही वाचनाची आवड रुजविण्यासाठी के.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता मन्ना यांच्या पुढाकाराने असेच विविध उपक्रम यापुढेही सुरू राहणार असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. अनघा राणे यांनी दिली. तसेच महाविद्यालयामध्ये व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने वाचन कट्टा हा उपक्रम राबवण्याचा मानस आहे, त्यादृष्टीनेही येत्या काळात विविध कार्यक्रमांची आखणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वाचन उपक्रमामध्ये महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अनघा राणे, उप प्राचार्य डॉ. संतोष कुलकर्णी, ग्रंथपाल आशिष कमाविसदार, मराठीच्या प्रा.मीनल सोहनी, डॉ. प्रल्हाद पवार, प्रा. अर्पिता कुलकर्णी, मानसी बर्वे, डॉ. अमित पंडीत, डॉ. जयश्री शुक्ला, डॉ. वैशाली पाटील, प्रा. रोहिदास सानप, प्रा. प्रज्ञा कदम, सीमा जाधव, अजय पाषाणकर, डॉ. किरण चव्हाण, ग्रंथालय कर्मचारी सुहास भगत आणि बाळासाहेब मोरे हेदेखील सहभागी झाले होते.