Home ठळक बातम्या उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हा, अन्यथा नुकसान झाल्यास तुम्हीच जबाबदार – कल्याण डोंबिवली...

उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हा, अन्यथा नुकसान झाल्यास तुम्हीच जबाबदार – कल्याण डोंबिवली काँग्रेसचा व्यापाऱ्यांना इशारा

 

कल्याण – डोंबिवली दि.10 ऑक्टोबर :
उत्तरप्रदेशमधील लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने उद्या सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यात कल्याण डोंबिवलीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही संपूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे. उद्याच्या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीतील व्यापारी आणि दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन या तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात आले आहे. तर बंदमध्ये सहभागी न झाल्यास होणाऱ्या नुकसानाला तुम्हीच जबाबदार असाल असा थेट इशारा कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसने दिला आहे.

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना जीपद्वारे चिरडण्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशच्या लखीमपूरमध्ये काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही घडले आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांच्या कल्याण डोंबिवलीतील स्थानिक नेत्यांनी उद्याच्या बंदमध्ये संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे सांगत कल्याण डोंबिवलीकरांनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.

तर कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे आज संध्याकाळी कल्याणातील दुकानदारांना निवेदन देत उद्याच्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच गोर गरिबांसाठी हा बंद पुकारण्यात आला असून कल्याण डोंबिवलीतील दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी त्यात सहभागी व्हावे. अन्यथा झालेल्या नुकसानास ते स्वतः जबाबदार राहतील असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन।पोटे यांनी दिला. यावेळी उपाध्यक्ष विमल ठक्कर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा