Home ठळक बातम्या केडीएमसी प्रभाग रचना : उल्हासनगरचा काही भाग केडीएमसीत घेतला – आमदार गणपत...

केडीएमसी प्रभाग रचना : उल्हासनगरचा काही भाग केडीएमसीत घेतला – आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप

 

प्रभाग रचनेवरून आमदार गायकवाड यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

कल्याण दि.14 फेब्रुवारी :
केडीएमसी निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे. तसतसं इथलं राजकीय वातावरणही तापायला सुरुवात झाली आहे. प्रभाग रचनेमध्ये केडीएमसीने उल्हासनगरचाही काही भाग आपल्यात दाखवक्याचा गंभीर आरोप कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे प्रभाग रचना केल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे. (KDMC ward formation: Part of Ulhasnagar taken over by KDMC – MLA Ganpat Gaikwad alleges)

केडीएमसी निवडणुकीसाठीचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा दोन आठवड्यांपूर्वी जाहीर झाला. त्याबाबत हरकती नोंदवण्यासाठी आज अखेरच्या दिवशी कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनीही आपले आक्षेप नोंदवले. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना प्रभाग रचनेबाबत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. यंदा केडीएमसी निवडणुक प्रथमच पॅनल पध्दतीने होत आहे. तर प्रारूप प्रभाग रचनेच्या सुरुवातीलाच डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनीही आक्षेप घेतला होता. त्यापाठोपाठ आता कल्याण पूर्व विभागाचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही प्रभाग रचनेवर आक्षेप घेत आपली हरकत नोंदवली. केडीएमसीच्या 8 पॅनलमध्ये चूकीच्या पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आल्याचे सांगत त्यातही उल्हासनगर महापालिकेचा काही भाग केडीएमसीत समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार गायकवाड यांनी यावेळी केला. प्रभाग रचना करणारे महापालिका अधिकाऱ्यांनी महापालिका क्षेत्रात फिरले नसून सत्ताधाऱ्यांना जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने ही प्रभाग रचना करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

तसेच पूर्वीच्या महापालिका निवडणुकीत टिटवाळा येथून प्रभाग रचना सुरू व्हायची. परंतू यंदा मात्र टिटवाळ्यापासून सुरु होणारी रचना उंबर्डेपासून सुरु करण्यात आली. म्हणजेच सत्ता असली तर सूर्य कुठूनपण उगवू शकतो अशी टीकाही गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

दरम्यान केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत भाजपच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून अजूनही काही प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्याबद्दल विचारले असता आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले की जे नगरसेवक पक्ष सोडून गेलेत ते आमचे कधीच नव्हते. जे गेले आणि जे जाणार आहेत त्यांचे आम्हाला काही एक दु:ख नाही. आमचे कार्यकर्ते सक्षम असून ते पक्षासाठी काम करत असल्याची प्रतिक्रिया आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा