कल्याण दि.24 जून :
कल्याण डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असतानाच कल्याणात बुधवारी रात्री अतिधोकादायक इमारतीच्या जिन्याच्या भलामोठा भाग कोसळला. सुदैवाने या प्रकारात कोणालाही दुखापत झाली नसली तरी या इमारतीच्या मागे असणाऱ्या दुसऱ्या इमारतीच्या संरक्षक भिंत आणि पत्र्यावर कोसळला. विशेष म्हणजे आजपासून केडीएमसी प्रशासनातर्फे ही इमारत पाडण्याचे काम सुरू होणार आहे.
कल्याण पश्चिमेत छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील आग्रा रोडवर चंद्रव्हीला 3 ( बदलापूरकर चाळ) ही तळ अधिक 2 मजल्याची इमारत आहे. त्यासमोर तळ अधिक एक एक मजल्याच्या 2 छोट्या इमरती असून त्याठिकाणी 16 कुटुंब वास्तव्य करत आहेत. कालच 23 जून 2021 म्हणजे बुधवारी केडीएमसीतर्फे चंद्रव्हीला 3 बाबत नोटीस बजावण्यात आली होती आणि आजपासून पालिका कर्मचाऱ्यांकडून त्याचे तोडकाम सुरू होणार होते अशी माहिती ‘क’ प्रभागक्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे यांनी दिली. मात्र काल रात्री या इमारतीचा जिनाच कोसळल्याने आता पालिका कर्मचाऱ्यांकडून तोडता येणार नाही. मात्र स्थानिक रहिवासी मोबदला मिळण्यासाठी कोर्टात गेल्यानं मशीनमार्फतच तोडकाम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर रहिवाशांना मोबदला मिळण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे पालिकेकडून दिली जातील आणि त्यांना मोबदला निश्चित मिळेल असेही गुडधे यांनी स्पष्ट केले.
तर चंद्रव्हीला 1 आणि चंद्रव्हीला 2 या इमारतीमधील रहिवाशांनी उच्च न्यायालयाकडून या करवाईवर स्टे आणला असल्याची माहिती स्थानिक भाडेकरू मुकेश ठक्कर यांनी दिली. चंद्रव्हीला 3 या इमारतीच्या तोडकामादरम्यान आमच्या दोन्ही इमारतीमधील रहिवाशांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्नही रहिवाशांनी उपस्थित केला आहे. आम्ही याठिकाणी 50-60 वर्षांपासून राहत असून चंद्रव्हीला इमारत तोडल्यानंतर आमचे हक्क आम्हाला मिळाले पाहिजेत एवढीच मागणी असल्याचे या रहिवाशांनी स्पष्ट केले.