Home ठळक बातम्या कल्याणातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग ढासळला

कल्याणातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग ढासळला

दुर्गाडी किल्ल्याच्या तातडीने डागडुजीची नागरिकांकडून मागणी

कल्याण दि.14 जून :
छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि ऐतिहासिक कल्याणचे सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग ढासळल्याने कल्याणकरांकडून हळहळ व्यक्त होत आहे. काल रात्रीच्या सुमारास हा भाग ढासळल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे.(Kalyan Durgadi Fort, chhatrapati shivaji maharaj)

दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूचा हा बुरुज आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काही वर्षांपूर्वीच इतर बुरुजांसह या जुन्या बुरुजावर नव्याने बांधकाम केले आहे. या नव्या बुरुजाचा खालील भाग ढासळला असल्याचे काल रात्री काही नागरिकांच्या लक्षात आले. तसेच या नव्याने बांधलेल्या बुरुजाला मोठमोठ्या भेगाही पडल्या असून तो भागही कधीही कोसळू शकण्याची भिती व्यक्त होत आहे.

तर दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराचा बाहेरील चौथराही एका बाजूने खचू लागला असून त्याची आणि या बुरुजाची तातडीने डागडुजी करणे आवश्यक बनले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यासाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची मागणी शहरप्रमुख रवी पाटील यांच्याकडून करण्यात आली असून त्यापैकी सुरवातीला अडीच कोटी आणि नंतर पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र अद्याप दुर्गाडी किल्ल्याच्या कामाला सुरुवात झालेली दिसत नाहीये.

दरम्यान कल्याणच्या या दुर्गाडी किल्ल्याला ऐतिहासिक महत्व असून छ्त्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊनच कल्याणच्या खाडी किनारी स्वराज्याच्या पहिल्या आरमाराची उभारणी केल्याचे सांगितले जाते. मात्र काळाच्या ओघामध्ये याठिकाणी आता दुर्गादेवीचे मंदिर, काही बुरुज आणि मुस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थळ इतकाच भाग शिल्लक आहे.

छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श या किल्ल्याला आणि कल्याण शहराला लाभलेलं असून त्यांची ही सुवर्ण क्षणांची ओळख असलेला दुर्गाडी किल्ल्याचे वैभव जपण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची अपेक्षा दुर्गप्रेमी आणि कल्याणकर नागरिक व्यक्त करत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा