इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या डॉ. अश्विन कक्कर यांचा पुढाकार
कल्याण दि.18 जुलै :
केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनूसार कल्याणच्या वैष्णवी मॅटर्निटी रुग्णालयात गर्भवती महिलांचे सशुल्क (शासकीय दरामध्ये) लसीकरण आजपासून सुरू झाले. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रमूख उपस्थितीत हा उपक्रम सुरू करण्यात आला. इंडियन मेडीकल असोसिएशनचे कल्याण आणि वैष्णवी मॅटर्निटी रुग्णालयाचे डॉ. प्रमूख अश्विन कक्कर यांच्या पुढाकाराने हे लसीकरण केले जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीनंतर कोणतीही गर्भवती महिला कोव्हिन अॅपवर लसीकरणासाठी नोंदणी करू शकते, किंवा जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकते. त्याबाबतच्या मार्गदर्शन सूचनाही केंद्र सरकारने जारी केल्या असून त्या सर्वांचे पालन करूनच कल्याणच्या वैष्णवी रुग्णालय लसीकरण केंद्रांवर गर्भवती महिलांचे सशुल्क लसीकरण केले जाणार आहे. आमदार विश्वनाथ भोईर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अधिकाधिक गर्भवती महिलांनी त्याचा लाभ घेण्याचे यावेळी आवाहन केले.
तर समाजातील गरीब आणि आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या 100 गर्भवती महिलांच्या लसीकरणाची जबाबदारी आयएमए कल्याणतर्फे घेण्यात आल्याची माहितीसंघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी दिली.
...लसीकरणासाठी गर्भवती महिलांना थेट प्रवेश
याठिकाणी लस घेण्यासाठी इच्छुक गर्भवती महिलांना कोणत्याही प्रकारे रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. याठिकाणी दररोज 50 गर्भवती महिलांचे सशुल्क लसीकरण केले जाणार असून सकाळी 10 ते 1 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. वैष्णवी प्रसूतीगृह असल्याने आम्ही गर्भवती महिलांच्या लसीकरणाला प्राधान्य दिल्याची माहिती डॉ. अश्विन कक्कर यांनी दिली.
18 वर्षांवरील इतर नागरिकांसाठीही दररोज 250 स्लॉट…
त्याचबरोबर याठिकाणी दररोज 18 वर्षांवरील 250 नागरिकांचेही सशुल्क लसीकरण केले जात असल्याची माहिती डॉ. अश्विन कक्कर यांनी दिली. केडीएमसीकडून मान्यताप्राप्त असणारे हे सशुल्क लसीकरण केंद्र असून दररोज 200 स्लॉट्स नागरिकांना कोवीन (cowin.gov.in) वेबसाईटद्वारे बुक करता येतील. दररोज संध्याकाळी 6 वाजता हे 200 स्लॉट्स कोवीन वेबसाईटवर ओपन केले जातील. तर ऑफलाईन लसीकरणासाठी दररोज सकाळी 6 वाजता या केंद्रावर टोकन दिले जाणार असल्याचेही डॉ. कक्कर यांनी स्पष्ट केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, शिवसेनेचे गणेश जाधव, डॉ. धीरज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.