Home ठळक बातम्या गतिमान आणि बदलत्या जगामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव राहणार की नाही – पद्मश्री...

गतिमान आणि बदलत्या जगामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव राहणार की नाही – पद्मश्री प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली चिंता

याज्ञवल्क्य पुरस्कार सोहळ्यात माजी प्र- कुलगुरू डॉ. नरेशचंद्र आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई धारप, पत्रकार मिलिंद बल्लाळ, श्रीकांत बोजेवार यांचा सन्मान

कल्याण दि.5 एप्रिल :
पूर्वीपेक्षा आजचे जग हे अतिशय गतिमान झाले असून तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सतत बदलत आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव राहील की नाही अशी चिंता पद्मश्री आणि रॅमसेसे पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली. कल्याणातील नामांकित याज्ञवल्क्य संस्थांच्या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यंदाचा याज्ञवल्क्य पुरस्कार हा मुंबई विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांना तर सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई धारप यांचा सुशीलाबाई एकलहरे आणि वरिष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ, श्रीकांत बोजेवार यांना विशेष पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आले. कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, मंत्री आशिष शेलार यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा शानदार सोहळा संपन्न झाला. (Padma Shri Prakash Amte expresses concern over whether social commitment will remain in a dynamic and changing world)

मी आणि माझी पत्नी मंदाकिनी आम्ही गेल्या 30 वर्षामध्ये बाहेर कुठेही गेलो नाही. मात्र आता आमच्या पुढच्या पिढीने लोक बिरादरीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली असल्याने आम्ही बाहेर पडू शकत असल्याचे त्यांनी सांगितले. तर याज्ञवल्क्य संस्था आणि पुरस्काराबाबत बोलताना ते म्हणाले की अशा प्रकारच्या सामाजिक पुरस्कारांनी आपल्या कामाची माहिती इतरांपर्यंत पोहोचतेच. पण त्याचसोबत इतरांनाही अशाप्रकारचे काम करण्याची प्रेरणा मिळते. आजतागायत आम्ही निरपेक्ष बुद्धीने काम केले असून कधीच कोणत्याही गोष्टीची अपेक्षा केली नाही. एकमेकाना मदत करणे हा आदिवासी समाजाचा त्यांचा धर्म असून त्यामुळे आमच्या जीवनात मोठा बदल झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

दुसऱ्यांच्या आत्म्याला मुक्ती देण्याचे या लोकांना वरदान- सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

दुसऱ्याच्या आत्म्याला मुक्ती देण्याचे वरदान देऊन परमेश्वराने यांना पाठवले आहे. हेतूशी प्रामाणिक राहणे सोपे नाही, या सामाजिक व्यक्ती आपल्या हेतूशी प्रामाणिक आहेत. दुसऱ्यासाठी करायची तळमळ, आम्हाला मतांसाठी असते , या मंडळींना कुठुन येते या प्रश्नाचे उत्तर म्हणजे दैवी देणगी असावी. त्यांच्यातील या प्रेरणेला पुरस्कार देणारा सोहळा म्हणजे याज्ञवल्क्य पुरस्कार सोहळा आहे. आपण समाजासाठी काही तरी देणं लागतो याची जाणीव करून देणारे कार्यक्रम म्हणजे हा याज्ञवल्क्य पुरस्कार सोहळा असल्याचे गौरवोद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी काढले.

 

बिर्ला महाविद्यालयाच्या वतीने पुरस्कार स्वीकारतो – डॉ. नरेशचंद्र
बिर्ला महाविद्यालयाच्या वतीने आपण हा याज्ञवल्क्य पुरस्कार नम्रपणे स्वीकारत आहे. बिर्ला महाविद्यालयाची प्रगती ही आजी माजी विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापन समिती यांचे एकत्रित प्रयत्नांतून झाली आहे. बिर्ला महाविद्यालय हे आपल्या सर्वांचे असून शहरातील प्रत्येक घरात आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी असेल ही अभिमानास्पद बाब असल्याचे डॉ. नरेश चंद्र यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले. तसेच यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते अतिशय भावुक झाले होते.

 

या पुरस्काराला सामाजिक बांधिलकीची किनार – संपादक मिलिंद बल्लाळ
सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांच्या हस्ते हा विशेष पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य असून माझे वडील कै. नरेंद्र बल्लाळ यांना हा पुरस्कार आपण अर्पण करत आहे. त्यामुळे या सामाजिक बांधिलकीची किनार या पुरस्काराला लाभलेली असून आपण त्याच मार्गांवर पुढे चालू असे मनोगत ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ यांनी व्यक्त केले. ठाणे वैभव वृत्तपत्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षनिमित्त त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या पुरस्कारामागे अनेक हात – विद्याताई धारप…
हा पुरस्कार आपण स्वीकारला असला तरी त्यामागे अनेक हात असून त्यांच्या जीवावर आपण हा पुरस्कार स्वीकारत आहे. मोबाईलमुळे मुले अभ्यास करत नसल्याची खंत यावेळी सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई धारप यांनी पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केली. यावेळी विद्याताई धारप यांना सुशीलाबाई एकलहरे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्याला डॉ. सौ. कलिका एकलहरे, कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड, महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्रीकांत बोजेवार, माजी आमदार नरेंद्र पवार, बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष ओ. पी. चितलांगे, केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कल्याण आय एम ए अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी याज्ञवल्क्य संस्थेचे अध्यक्ष आ. वी. जोशी, विश्वस्त राधाकृष्ण पाठक, मिलिंद कुलकर्णी, राजीव जोशी, महिला उपाध्यक्ष निशा मांडे, कार्यवाह प्रसन्न कापसे यांच्यासह सर्वच सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

१ कॉमेंट

  1. जेष्ठ समाज सेवक प्रकाश जी आमटै साहेब, हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला हवा, कधी तरी सरकारी धोरणांवर बोलायला हवं आपण त्याचा साकारात्मक परिणाम होऊ शकतो….

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा