कल्याण दि.1 ऑक्टोबर :
ओव्हर हेड वायरला होणारा विद्युत पुरवठा अचानक खंडीत झाल्याने ठाकुर्ली आणि कल्याण स्टेशन दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक गेल्या 2 तास विस्कळीत झाली. त्यामुळे ऐन सायंकाळी कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. ठाकुर्ली – कल्याण स्टेशन दरम्यान स्लो ट्रॅकवर सायंकाळी 7.12 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला . तर बराच वेळ होऊनही लोकल पुढे जात नसल्याने अनेक प्रवाशांनी अखेर लोकलमधून ट्रॅकवर पायी चालत जाणे पसंत केले.
दरम्यान या तांत्रिक बिघाडाची माहिती कळताच मध्य रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र गेल्या एक तासांपासून धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाल्याने गाड्यांच्या एकामागोमाग एक लांबा लागल्याचे दिसून आले.
अखेर दोन तासांनी मध्य रेल्वेची वाहतूक झाली सुरू…
मध्य रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम करत हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात यश मिळवले. त्यामुळे रात्री 9.12 वाजण्याच्या सुमारास म्हणजेच बरोबर दोन तासांनंतर स्लो मार्गावरील रेल्वेची वाहतूक सुरू झाली. तर या दरम्यान खोळंबलेल्या लोकलमध्ये एक गर्भवती महिला असल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिसाना मिळाली होती. रेल्वे पोलिसांनी त्या महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.