ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने सखल भाग जलमय
कल्याण – डोंबिवली दि.७ ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीत साधारणपणे बारा वाजण्याच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवलीची अक्षरशः दाणादाण उडालेली पाहायला मिळाली.
मागील आठवड्यात पावसाने दडी मारल्याने काहीशी उघडीप मिळाली होती. मात्र आज सकाळपासून अचानक ढग दाटून आले आणि धुंवाधार पावसाला सुरुवात झाली. आता थांबेल मग थांबेल करता करता या पावसाला थांबण्यासाठी थेट संध्याकाळ उजाडली.
मध्येच ढगांच्या गगडाटासह मुसळधार तर मध्येच हलक्या स्वरूपाच्या सरी असा पावसाचा काहीसा अनोखा अंदाज दिसत होता. मात्र अवघ्या काही तासांतच या पावसाने शंभरी ओलांडत कल्याण डोंबिवलीला ओलेचिंब करून सोडले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबल्याने रस्त्यांवर पडलेले खड्डे पुन्हा भरण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने तयारी सुरू केली होती. मात्र आज झालेल्या या पावसाने केडीएमसीच्या या तयारीवर पाणी फेरले.