डोंबिवली दि. 23 जानेवारी :
केडीएमसीकडून एकीकडेशहरांच्या सौंदर्यीकरणासाठी उपक्रम राबवले जात असताना काही समाजकंटक मात्र त्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहे. कल्याण पूर्वेतील कचोरे भागात पालिकेने देशातील दिग्गज व्यक्तींची भित्तीचित्र रेखाटली आहेत. त्या चित्रांवर अज्ञात व्यक्तीने मजकूर लिहून त्याचे विद्रुपीकरण केल्याने संताप व्यक्त होत आहे. (Outrageous: Defacement of pictures of famous players, case filed by municipality)
गेल्या काही वर्षांपासून कल्याण डोंबिवली शहरांना लागलेला अस्वच्छतेचा डाग पुसण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडून विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. कल्याण डोंबिवलीतील सामाजिक संस्था, नामांकित व्यक्तींच्या लोकसहभागातून एकाच वेळी दोन्ही शहरांत सौंदर्यीकरण केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वे समांतर रस्त्यावर असलेल्या भिंतीवर देशातील दिग्गज व्यक्तींची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. ज्यामध्ये शास्त्रज्ञ, खेळाडू, तंत्रज्ञ आदी नामांकित व्यक्तींचा समावेश आहे. त्यापैकी कचोरे येथील भिंतीवर रेखाटण्यात आलेल्या खेळाडूंच्या चित्रांवर अज्ञात व्यक्तीने अनावश्यक मजकूर लिहून ही चित्रे विद्रूप केली आहेत. या भिंतीवर असलेल्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या चित्रांबाबत हाच प्रकार घडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान या प्रकाराची दखल घेऊन केडीएमसी प्रशासनाकडून याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती केडीएमसी सचिव संजय जाधव यांनी दिली आहे. तसेच कल्याण डोंबिवली नगरी स्वच्छ ,सुंदर रहावी याकरता प्रशासनाकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी नागरिक दुभाजकांवर पानाची पिचकारी मारणे, रेखाटलेली सुंदर छायाचित्रे खराब करणे अशा कृतीतून शहराच्या विद्रूपीकरणात भर घालत असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
मात्र अशा प्रकारची कृत्ये अजिबात सहन केली जाणार नसल्याचे सांगत कचोरे येथील प्रकारा विरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे संजय जाधव म्हणाले.