कल्याण दि.27 फेब्रुवारी :
विरोधक काय बोलतात यापेक्षा आपल्या विभागात आणखी निधी कसा येईल यावर आपण भर देत असल्याचे उत्तर कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. त्याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला खासदार डॉ. शिंदे यांनी अतिशय खिलाडू वृत्तीने उत्तरं दिली.
जेव्हापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आले आहे, तेव्हापासून एमएमआर रिजनमध्ये मोठा निधी आणण्यात यशस्वी झालो असल्याचेही खासदार डॉ. शिंदे म्हणाले. तर येणाऱ्या काळात अजून जास्त विकास कामांसाठी निधी कसा येईल याच्यावर आपला भर असेल. विरोधक काय करतात? विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या, आपण आपल्या कामातून लोकांपर्यंत पोहचत असल्याची कोपरखळीही खासदार डॉ. शिंदे यांनी विरोधकांना लगावली.
प्रत्येक शहरात फुटबॉलसाठी स्वतंत्र मैदानासाठी प्रयत्न..
स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी येणाऱ्या काळात आणखी अशा स्पर्धा भरवल्या जातील. तर ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शहरात फुटबॉलसाठी स्वतंत्र मैदानासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. आता मातीमध्ये फुटबॉल खेळत आहेत. मात्र येणाऱ्या काळात फुटबॉलसाठी अधिकाधिक चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी अध्यक्ष या नात्याने आपण काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल फुटबॉल संघटना आणि युवासेना सहसचिव योगेश निमसे यांच्या माध्यमातून कल्याणात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, माजी महापौर वैजयंती घोलप – गुजर, माजी सभागृह नेते रवी पाटील, माजी नगरसेवक निलेश शिंदे, गणेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.