कल्याण दि.11 मार्च :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने लागू केलेले निर्बंध पायदळी तुडवत जंगी विवाह सोहळा आयोजित केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने कल्याण पूर्वेत आयोजकावर गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्याच्या आयोजनाबाबत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने आधीच निर्बंध लागू केले आहेत. मात्र त्या नियम आणि निर्बंधांना काही जणांकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे आढळून आले आहे. कल्याण पूर्वेत काल संध्याकाळी अशाच प्रकारचा जंगी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्याठिकाणी 700च्या आसपास लोकांची उपस्थिती होती अशी माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली. 5/ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे आणि त्यांच्या पथकाने पाहणी केली असता या विवाह समारंभात सुमारे 700 लोक उपस्थित असण्यासह सोशल डिस्टन्सिगचे पालन न करणे, तोंडाला मास्क न लावणे अशा प्रकारचे बेजबाबदार वर्तन केल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे या विवाह सोहळ्याच्या आयोजकांवर कलम 188, 269, 270, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 तसेच कोविड-19 उपाययोजना नियम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे केडीएमसी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.