अंतिम टप्प्यात आलेल्या पत्रीपुलाच्या कामाची पाहणी
कल्याण दि.11 जानेवारी :
अंतिम टप्प्यामध्ये काम आलेल्या पत्रीपुलाच्या उभारणीत किती अडचणी आल्या हे सर्वश्रुत आहे. मात्र आता लवकरच तो पूर्ण होणार असून विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीही नसल्याने पत्रीपुलाच्या मुद्द्यावरून विनाकारण टिका होत असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. खासदार डॉ. शिंदे यांनी पत्रीपुलाच्या कामाची पाहणी केली.
कल्याण आणि डोंबिवलीकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणाऱ्या नविन पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या काम अंतिम टप्प्यात आलेले असले तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागला. तांत्रिक मुद्द्यांबरोबरच गेल्या वर्षी कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनचाही पुलाच्या कामावर परिणाम झाला असला तरी या सर्व अडचणींवर मात करून हा पूल लवकरच नागरिकांच्या सेवेत रुजू होईल असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
पत्रीपुलावर मुख्य सिमेंट काँक्रीट टाकण्याचे स्लॅब काम झाले असून दोन्ही बाजूकडील अप्रोच रोडचे कामही वेगाने सुरू आहे. उर्वरित कामे ही काही दिवसात पूर्ण होईल. हे तांत्रिक काम आहे, यामध्ये किती अडचणी आल्या हे सर्वांना माहिती आहे. त्यावर यशस्वी मात करून आपले काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही दिवसांतच पत्रीपुल सूरु होईल असा विश्वास व्यक्त करत खासदार डॉ. शिंदे यांनी विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीही राहिले नसल्याने विनाकारण या मुद्द्याचा बाऊ केला जात असल्याचे स्पष्ट केले.
तर मुळातच हा पूल करण्यासाठी एमएसआरडीसीने मार्च 2021 ची डेडलाईन आखून दिली असून त्यामध्ये लॉकडाऊनच्या सहा महिन्यांची शासनाकडून मुदतवाढही देण्यात आल्याची माहिती पुलाच्या कंत्राटदाराने दिली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे हे काम अपेक्षेपेक्षा अधिक लवकर पूर्ण होत असल्याचेही या कंत्राटदाराने सांगितले.