रोटरी क्लबच्या कार्यक्रमात कल्याणातील नामांकित डॉक्टरांचे मत
कल्याण दि. 7 जुलै :
सोशल मिडीया असो की गुगल..या दोन्ही ठिकाणी आरोग्यविषयक केवळ माहिती उपलब्ध असते. मात्र डॉक्टरांकडून केला जाणारा सारासार विचार नसतो असे परखड मत कल्याणातील नामांकित बालरोग तज्ज्ञ डॉ. अनंत ईटकर आणि डॉ. अश्विन कक्कर यांनी व्यक्त केले. “डॉक्टर्स डे” निमित्त रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंडतर्फे आयोजित “स्त्री आणि तिचे मातृत्व” या कार्यक्रमात ते बोलत होते. सुप्रसिद्ध सुसंवादिका दिपाली केळकर यांनी ही प्रकट मुलाखत घेतली. (Only health information available on social media”)
बाळाच्या मोबाईलपेक्षा आईकडील मोबाईल दूर जाणे गरजेचे…
हल्लीच्या काळात मोबाईलशिवाय चिमुरड्या मुलांचे पानही हालत नाही. मात्र बाळासाठी होणाऱ्या मोबाईल वापरापेक्षा त्याच्या आईकडे असणारा मोबाईल दूर जाणे गरजेचे असल्याचे नामांकित बालरोग तज्ज्ञ डॉ. अनंत ईटकर यांनी सांगितले. मोबाईलमुळे बाळ आणि आईमधील संवाद नामशेष होण्याच्या मार्गावर आला असून त्याचे गंभीर परिणाम बाळाच्या वाढीमध्ये होत असून याला वेळीच आवर घालण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
म्हणून नैसर्गिक प्रसूतीची जागा आता सिझेरियनने घेतली…
तर पूर्वी आपल्या घरची धुणी, भांडी, लादी ही सर्व कामे पूर्वी घरातील स्त्रिया करायच्या. या सर्व कामातून गर्भवती स्त्रियांचा आपसूकच शारीरिक व्यायाम व्हायचा, ज्यामुळे त्यांची नैसर्गिकपणे प्रसूती व्हायची. परंतु काळाच्या ओघात ही सर्व कामेही बंद झाली आणि गर्भवती स्त्रियांमधील नैसर्गिक प्रसूतीची जागा आता सिझेरियनने घेतल्याची खंत सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. अश्विन कक्कर यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बाळ आणि आईचा आहार, त्यांचा व्यायाम, लसीकरण, आई आणि बाळाचे वजन, झोप, बदलत्या जीवन शैलीचा परिणाम आदी प्रमूख मुद्द्यांवर डॉ. ईटकर आणि डॉ. कक्कर या दोघांनीही साध्या आणि सोप्या शब्दांत प्रकाशझोत टाकला.
या कार्यक्रमाला इंडीयन मेडीकल असोसिएशन ऑफ कल्याणच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, डॉ. सुरेश तेलवणे, अचिव्हर्स कॉलेजचे महेश भिवंडीकर सर, नाट्यकर्मी मेघन गुप्ते, रोटरी क्लबचे अध्यक्ष अरविंद शिंदे,माजी अध्यक्ष बाळासाहेब एरंडे, प्रबोध तानखीवाले आदी मान्यवर उपस्थित होते.