कल्याण दि.7 मे :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यात येत्या 10 मे पासून 15 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्याबाबतचा केवळ प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला आहे. यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी निर्णय घेणार असून याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार दिपक आकडे यांनी एलएनएनला दिली आहे. तसेच सोशल मिडियावर व्हायरल झालेला मेसेजही चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Only a proposal regarding strict restrictions in Kalyan taluka has not been decided yet – informed Tehsildar Deepak Akade)
कल्याण तालुक्यात अर्थात ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण तहसिल कार्यालयाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला कडक निर्बंध लावण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. मात्र या प्रस्तावाची जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेली प्रत समोर न आणता केवळ कडक निर्बंधांचे पत्रच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे तहसीलदार आकडे यांनी सांगितले. दरम्यान या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्याबाबत अंतिम निर्णय झाल्यास त्याची पूर्वसूचना नक्की दिली जाईल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रात कल्याण तालुक्यासह कल्याण आणि डोंबिवली शहरातही लॉकडाऊन होणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. मात्र लोकांनी या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही शासकीय यंत्रणांनी केले आहे. कल्याण तहसिल कार्यालयाच्या क्षेत्रात कल्याण डोंबिवली ही शहरे येत नाहीत. कल्याण तालुक्याचा ग्रामीण भागात असणारी गावे ही या तहसिल कार्यालयाच्या अखत्यारीत येतात.