डोंबिवली दि.8 जुलै :
डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी 15 वर्षांच्या तिघा अल्पवयीन अट्टल चोरट्यांना अटक करत वाहन चोऱ्यांचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
डोंबिवली परिसरात दिवसा आणि रात्रीच्या सुमारास दुचाक्यांसह रिक्षा चोऱ्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने अशा गुन्ह्यांना आवर घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकांनी नाकाबंदी, कोबिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगार, पाहिजे असलेले फरारी, तसेच जेल- बेल रिलीज आरोपींना सातत्याने तपासण्याची मोहीम राबवली.
पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील एका 15 वर्षीय मुलाकडे अचानक पैसा आला. तो मोबाईल आणि नविन कपडे विकत घेण्यामध्ये पैसे खर्च करत असल्याची माहिती कळताच पोलिसांनी त्याच्या हालचालीवर पाळत ठेवली होती. हा मुलगा गैरमार्गाने कुठून तरी पैसे आणत असल्याची खात्री पटताच ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता हे सर्व चोरीचे गुन्हे उघड झाले. डोंबिवलीतून 4 दुचाक्या चोरल्याची या मुलीने कबुली दिली. या चोरट्याकडून 4 गुन्ह्यांतील 92 हजार रुपये किंमतीच्या दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या. तसेच खबरीकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी आणि रिक्षा चोरी करणाऱ्या इतर 2 चोरट्यांना मुंब्र्यातून गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान या दुकलीने डोंबिवलीतून एकूण 5 दुचाक्या चोरल्याची कबुली दिली. अधिक चौकशीदरम्यान कोळसेवाडी, दिंडोशी, तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 2 रिक्षा आणि 1 दुचाकी चोरल्याचीही त्यांनी कबुली दिली. अशा एकुण 8 गुन्ह्यांतील 3 लाख 12 हजार रूपये किंमीतीच्या दुचाक्या आणि रिक्षा या दोन्ही चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या नेतृत्वाखाली फौजदार संदीप शिंगटे, फौजदार दिपक दाभाडे, हवा शंकर निवळे, विकास भामरे, विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, प्रशांत वानखेडे, हेमंत राणे आणि वैजीनाथ रावखंडे या पथकाने एकूण 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या तिन्ही चोरट्यांकडून 4 लाख 4 हजार रूपये किंमतीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. हे तिन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले.