कल्याण दि.१ एप्रिल :
राज्य सरकारकडून कोवीडचे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह असतानाच कल्याणकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या २ वर्षांपासून कोरोनामूळे खंडीत झालेली गुढीपाडव्याची स्वागतयात्रा कल्याण पश्चिमेतही आयोजित करण्यात आली आहे.
ऐन वेळेला मिळालेली परवानगी आणि गुरुवारी शासनाने मागे घेतलेले निर्बंध यामुळे यंदाची स्वागतयात्रा पालखी सोहळा, भजनी मंडळ आणि ढोल ताशा पथक अशा पद्धतीने त्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कल्याण शहर अध्यक्ष महेश केळकर यांनी दिली.
तसेच सकाळी ७ वाजता कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथून या स्वागतयात्रेला प्रारंभ होणार असून तिथून शंकरराव चौक, देवी अहिल्याबाई होळकर चौक, लोकमान्य टिळक चौक, पारनाका, लाल चौकी आणि नमस्कार मंडळ येथे संपन्न होणार आहे. कल्याणातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या स्वागत्यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान कल्याण पश्चिमेप्रमाणे कल्याण पूर्वेतील नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे कल्याण पूर्वेतही स्वागतयात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.