कल्याण दि. २० ऑगस्ट :
देशाच्या स्वातंत्र्याचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष असून देशभरात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. कल्याणातील नामांकित के. एम. अग्रवाल महाविद्यालयातर्फेही अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘ हर घर तिरंगा आठवडा ‘ अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत अग्रवाल महाविद्यालयाने अनेक सामाजिक उपक्रम आयोजित केले होते.
देशभरात ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. के. एम अग्रवाल महाविद्यालयातर्फे स्वातंत्र्य दिनाच्या एक आठवडा आधीपासूनच विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. ९ ऑगस्ट पासून सुरू झालेले हे कार्यक्रम १७ ऑगस्टपर्यंत सुरू होते. ज्यामध्ये इतिहास विषयावर लेक्चर, हेरिटेज वास्तूंना भेट आणि स्वच्छता अभियान, कॉलेज स्वच्छता अभियान, निबंध लेखन, कविता वाचन, पठण, पोस्टर मेकिंग, रांगोळी स्पर्धा, पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण, प्रभात फेरी, शोभा यात्रा, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, फिल्म शो अशा भरगच्च कार्यक्रमांचा समावेश होता. ज्यामध्ये महाविद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे दिसून आले.
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. आर. बी. सिंह, सहसचिव ओमप्रकाश मुन्ना पांडे, खजिनदार दिनेश सोमाणी, ट्रस्टी राजू गवळी, प्राचार्य डॉ. अनिता मन्ना, उप प्राचार्य डॉ. राज बहाद्दूर सिंह, अनघा राणे, नोडल ऑफिसर आशिष कमाविसदार, सुहास भगत यांच्यासह संबंधित उपक्रमांचे प्रमुख उपस्थित होते.