
आमदार विश्वनाथ भोईर यांच्यातर्फे आयोजन
कल्याण दि.७ नोव्हेंबर :
दिपावलीच्या पुर्वसंध्येला कल्याणच्या सुप्रसिद्ध भगवा तलाव परिसरात दिपोत्सव – एक दिवा शिवरायांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत असून या दिपोत्सवामध्ये सर्व शिवप्रेमी आणि कल्याणकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कल्याण शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम होत आहे. कल्याण पश्चिमेतील सुप्रसिद्ध भगवा तलाव येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक परिसरात उद्या बुधवार 8 नोव्हेंबर 2023 रोजी हा दिपोत्सव साजरा केला जाणार आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल एक हजार दिव्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची 10×10 फुटांची भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्यासोबत यावेळी उपस्थित मान्यवर आणि कल्याणकर नागरिकांच्या हस्ते भगवा तलाव परिसरात शेकडो दिप प्रज्वलित केले जाणार असल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.
तसेच या दिपोत्सवामध्ये सर्व शिवप्रेमी आणि कल्याणकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.