संबंधित व्यक्तीची प्रकृती स्थिर असून केवळ सौम्य स्वरूपाची लक्षणे
कल्याण – डोंबिवली दि.4 डिसेंबर :
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई- दिल्लीमार्गे मुंबई आणि नंतर डोंबिवलीत आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण असून त्याने कोणतीही कोवीड लस घेतली नसल्याची माहितीही समोर आली आहे. केडीएमसी आरोग्य विभागाकडूनही या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
गेल्या महिन्यात २४ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला होता. मात्र इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे.
तसेच या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळल्याची माहितीही जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान या तरुणाला कोणत्याही प्रकारची लक्षणे नसून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केडीएमसी साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी एलएनएनशी बोलताना दिली.