कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण तापले
डोंबिवली दि.20 नोव्हेंबर :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हळूहळू इथले राजकीय वातावरणही तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपने डोंबिवलीत जनआक्रोश मोर्चाद्वारे महाविकास आघाडी आणि शिवसेनेविरोधात हल्लाबोल केल्यानंतर आता शिवसेनेनेही भाजपवर पलटवार केला आहे.
कल्याण डोंबिवलीतील विविध विकासकामांसह राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी गुरुवारी आक्रोश मोर्चादरम्यान शिवसेनेवर टिका करताना विविध आरोप केले. त्याला उत्तर देताना शिवसेना नेते दिपेश म्हात्रे यांनी सांगितले की शिवसेना ही केवळ विकासकामांसाठी कामे करते. तर कमिशन खाण्याची सवय ही भाजपला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीत कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करत त्या कामांची प्रत्यक्षात सुरवातही झाली आहे.
मात्र भाजप आमदार चव्हाण यांनी निवडणूकीच्या तोंडावर ४७२ कोटी मंजूर करुन आणल्याचे सांगत कामाचे नारळ फोडले होते. हा निधी कोणत्या खात्यामार्फत मंजूर करुन आणला होता.? निधी मंजूर झाला होता तर त्या निधीतून कामे का झाली नाहीत? असे प्रश्नही दिपेश म्हात्रे यांनी उपस्थित केले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये पायाभूत सुविधांचा ज्या पद्धतीने विकास केला जात आहे. त्यामुळे भाजप आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचे सांगत आमदार रविंद्र चव्हाण हे विकासकामातील शुक्राचार्य असल्याचा घणाघाती आरोपही म्हात्रे यांनी केला. यावेळी शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हेदेखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
दरम्यान केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप – प्रत्यारोपाचे नवनविन अध्याय पाहायला मिळतील यात कोणाचेही दुमत नसेल.