डोंबिवली दि.11 फेब्रुवारी :
देशाच्या शालेय क्षेत्रातील एक दिग्गज नाव म्हणजे सिंघानिया स्कूल. देशातील पहिल्या पाच शाळांमध्ये आपला दबदबा कायम राखलेली ही शाळा आता लवकरच डोंबिवलीत सुरू होत आहे. शाळेच्या संचालिका रेवती श्रीनिवासन यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (Now Gautam Singhania Global School will start in Dombivli too)
मोठा गाव ठाकूर्ली येथे सुरू असणाऱ्या एका बडय़ा गृहसंकुल प्रकल्पामध्ये येत्या जूनपासून शाळेचा श्रीगणेशा होत आहे. शाळेसाठी आवश्यक असणारी मोकळी जागा आणि चांगले वातावरण या पार्श्वभूमीवर आम्ही डोंबिवलीमध्ये ही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे श्रीनिवासन यांनी सांगितले.
गेल्या दशकभरापासून सिंघानिया शाळा देशात टॉप पाईव्हमध्ये येत आहे. ठाण्यात सिंघानिया शाळेच्या तीन शाखा असून ठाण्यापाठोपाठ आता डोंबिवलीतही शाळा सुरु केली जात आहे. त्याकरीता येत्या १२ फेब्रुवारी रोजी पालकांशी संवाद साधला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात नर्सरी टू केजी या वर्गाची सुरुवात केली जाणार असून एक हजार ते बाराशे विद्यार्थीपर्यंत क्षमता असणार आहे. तर शाळेत प्रवेश देण्यासाठी डोनेशन घेतले जात नाही आणि अन्य शाळांच्या तुलनेत या शाळेची वार्षिक फीही मर्यादीत आणि पालकांच्या खिशाला परवडणारी असल्याचे श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले.
आमच्या शाळेमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात यशस्वी होतील असे विद्यार्थी घडविले जाण्यासह आनंददायी शिक्षणाची संकल्पनाही राबविली जाते. तर डोंबिवली ही सुशिक्षितांची नगरी आहे. त्यानगरीमध्ये सिंघानिया शाळेचा प्रवेश झाला असून त्यामुळे डोंबिवलीतील शैक्षणिक दर्जा नक्कीच वाढील लागेल असा विश्वास संचालिका श्रीनिवासन यांनी यावेळी व्यक्त केला.
तर डोंबिवलीमध्ये ग्लोबल स्कूल सुरु व्हाव्यात अशी आपली पूर्वीपासूनच अपेक्षा होती. डोंबिवलीमध्ये काही ग्लोबल स्कूल आहेत. मात्र सिंघानिया शाळेमुळे डोंबिवलीचा नौवलौकिक नक्कीच वाढणार असल्याचा विश्वास माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला.