
३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरण्यासाठी केडीएमसीचा निर्णय
कल्याण डोंबिवली दि. ४ मे (LNN):
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर अखेर केडीएमसी क्षेत्रातही पाणीकपात लागू करण्यात आली आहे. येत्या मंगळवारपासून म्हणजेच 9 मे 2023 पासून त्याला सुरुवात होणार असून दर मंगळवारी (सोमवारी रात्री १२ ते मंगळवारी रात्री १२) 24 तास कल्याण डोंबिवली क्षेत्रात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (LNN)
मान्सूनचे आगमन लांबण्याच्या शक्यतेने निर्णय…
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी यासंदर्भात प्रेसनोट काढत या पाणीकपातीची माहिती दिली आहे. बदलत्या ऋतूचक्रामुळे यंदा मान्सूनच्या आगमनावर विपरीत परिणाम होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनचा प्रवास लांबल्यास पावसाळाही उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. ती गृहीत धरून सध्या धरणात उपलब्ध असणाऱ्या पाणीसाठ्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने केडीएमसीकडून हा पाणी पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.(LNN)
24 तास बंद राहणार पाणीपुरवठा…
पाणीकपातीच्या निर्णयानुसार केडीएमसी क्षेत्रात सोमवारी रात्री १२ ते मंगळवारी रात्री १२ असा 24 तास हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. येत्या 31 ऑगस्ट म्हणजेच पुढील ३ महिन्यांपर्यंत ही पाणीकपात लागू राहणार आहे.(LNN)
कल्याण डोंबिवलीसह या भागात पाणीकपात लागू…
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बारावी, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, शहाड, वडवली, आंबिवली, टिटवाळा यांच्यासह डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिम या भागात दर मंगळवारी 24 तास पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. परिणामी नागरिकांनी पुरेसा पाण्याचा साठा करून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहनही या पत्राद्वारे करण्यात आले आहे. (LNN)