कल्याण दि. १७ जुलै :
समाजातील नकारात्मक विचार पुसून आपली मूळ संस्कृती आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी बालक मंदिर संस्थेतर्फे दिप अमावस्येनिमित्त दिपपूजनाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. बालक मंदिर संस्थेच्या प्राथमिक शाळेतर्फे साजऱ्या झालेल्या दीपोत्सवाला विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठी गर्दी केली होती.
प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीमधील सण – उत्सवांची निसर्ग आणि विविध ऋतुंशी घट्ट नाळ जोडण्यात आली आहे. इतर महत्वाच्या सणांपैकी एक महत्वाचा असणारा आजचा दिवस. आपल्या संस्कृतीमध्ये आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मोठे महत्व असून ही अमावस्या आपल्याकडे दिप अमावस्या म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही वर्षांत लोकांच्या मानसिकतेत बदल होऊन हा दिवस दिप अमावस्येऐवजी ‘गटारी ‘नावाने कुप्रसिद्ध झाला आहे. जणू काही एखादा राष्ट्रीय सण असावा अशा दृष्टीने लोकं त्याकडे पाहू लागले आहेत. हे चित्र बदलण्यासाठी बालक मंदिर संस्थेतर्फे हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती मुख्याध्यापिका कल्पना पवार यांनी दिली.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरून विविध आकाराच्या, बहुरंगी पणत्याही आणल्या होत्या. त्यासोबतच भव्य अशी दीपमाळ, लामण दिवा, कंदील, चिमणी तसेच जुन्या काळातील दिवेही आजच्या अमावस्येनिमित्त प्रज्वलित करण्यात आले होते. तर फुलांची सुबक रांगोळी काढून श्रावण मासाचे स्वागत करण्यात आले.भारताच्या स्वातंत्र्याच्या “अमृत महोत्सवी” वर्षाची सांगता करताना देशाच्या महान नेत्यांच्या स्मृतींची आठवण ठेऊन त्यांच्या प्रतिमेभोवतीही दिप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अनिल कुलकर्णी, मुग्धा केळकर, बजरंग तांगडकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक शशिकांत गवारे, सुबोध कुलकर्णी विलास लिखाड, जितेंद्र निकुंभ, प्रतिभा मोरे, कामिनी पाटील, रेश्मा रत्न पारखी, योजना चौधरी, रेखा महिंद्रकर, विद्या घुले, संगीता मुंडके, वैशाली शिंपी, मिनाक्षी सरोदे, कविता पाटील, दिपाली पाटील यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कामिनी पाटील, पाहुण्यांची ओळख भालचंद्र घाटे यांनी तर प्रकाश पानसरे यांनी आभार मानले मानले.