३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाची कल्याणात सुरुवात
कल्याण दि. १२ जानेवारी :
सध्या होणाऱ्या अपघातांना केवळ वाहन चालकांनाच दोषी ठरवून चालणार नाही तर रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांनीही वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली. कल्याण पश्चिम शहर वाहतूक पोलिसांतर्फे ३३ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा आजपासून प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी हे मत मांडले.
रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांना केवळ वाहन चालकांनाच दोषी ठरवून चालणार नाही. त्यासाठी रस्त्यांची दुरावस्था, पादचाऱ्यांचा निष्काळजपणा या कारणांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच अपघातमुक्त रस्ते ही केवळ वाहतूक पोलिसांचीच नव्हे तर आपल्या सर्वांचीच जबाबदारी असल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केले.
कल्याण शहर वाहतूक शाखेतर्फे आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन आमदार विश्वनाथ भोईर, डीसीपी सचिन गुंजाळ, कल्याण आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, आयुष हॉस्पिटलचे डॉ. राजेश राजू, ईशा नेत्रालयचे डॉ. स्मितेश शहा, कल्याण जायंटस् ग्रुप ऑफ कल्याण मिड टाऊन सहेलीच्या डिंपल दहिफुले, पाटील, आयुर हॉस्पिटलच्या डॉ. प्रियंका, आरएसपी युनिट कमांडर मणीलाल शिंपी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कल्याण ट्रॅफिकचे एसीपी मंदार धर्माधिकारी, कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाहन चालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ज्यामधे नेत्र तपासणी, रक्त तपासणी, मधुमेह, रक्तदाब आदी विकारांची यावेळी तपासणी करण्यात आली. ज्यामधे २०० ते ३०० वाहन चालक, रिक्षाचालक, ट्रक चालक यांच्यासह वाहतूक पोलिसही यामध्ये सहभागी झाले होते.
तर कर्तव्य बजावताना आपला हात गमावलेल्या ट्रॅफिक वॉर्डन सत्यजित गायकवाड यांना या कार्यक्रमात आर्थिक मदत देऊन सत्कारही यावेळी करण्यात आला. तसेच कर्तव्यावर असताना अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचवणाऱ्या आणि विविध गुन्ह्यांतील चोरीच्या गाड्या पकडुन देणाऱ्या वाहतूक पोलिसांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.