कल्याण दि.8 जानेवारी :
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार संविधानाच्या चौकटीत पूर्णपणे प्रयत्न करत आहे. सध्या लागू असलेले ६२ टक्के आरक्षण सोडून इतर आरक्षणात मराठा समाजाला सामावून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असताना काही जण टोकाची भूमिका घेऊन आरक्षणाच्या विषयावर मुंबईत येण्याची भाषा करतात. यामधून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांना दिला. कल्याण मुरबाड मार्गावरील वरप गावामध्ये ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे देशाचा कारभार चालत असून संविधानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये…
मार्चमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागेल. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद दाखवून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन अजित पवार यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले. राज्याचे हित आणि सामान्यांचे कल्याण हाच विचार डोळ्यासमोर ठेऊन राज्य सरकार कार्यरत असून ठाणे जिल्ह्यातील विकासाला अजिबात निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विकासाऐवजी अनावश्यक मुद्द्यांद्वारे तेढ निर्माण करण्याचे काम…
सद्या काही वाचाळवीर विकासाच्या विषयावर चर्चा करण्याऐवजी अनावश्यक मुद्दे उपस्थित करून समाजात तेढ निर्माण करत आहेत. राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा वाचाळवीरांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन अजित पवार यांनी आव्हाडांचे नाव न घेता केले.
इतकं वय झालंय पण थांबणार कधी?…
वय वाढते त्याप्रमाणे सरकारी कर्मचारी निवृत्त होत जातात, प्रत्येक जण निवृत्तीचे नियोजन करतो. आम्ही मात्र वय ८४ झाले तरी निवृत्त होण्यास, थांबण्यास तयारच नाहीत. एवढा हट्टीपणा आमचे ऐकायला तयार नसल्याचा पुनरुच्चारही अजित पवार यांनी यावेळी केला. तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपसोबत आम्ही गेल्याची भूमिका मांडली.
या कार्यकर्ता मेळाव्याला खासदार सुनील तटकरे, ठाणे पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळे, युवा नेते पार्थ पवार, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.