उद्या 1 डिसेंबरच्या बैठकीत होणार निर्णय
कल्याण – डोंबिवली दि.30 नोव्हेंबर :
एकीकडे राज्य शासनाने 1 डिसेंबरपासून राज्यात 1 ली ते 7 पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे जाहीर केले असले तरी कल्याण डोंबिवलीत मात्र उद्यापासून शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. उद्या 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती केडीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
कोवीडची कमी होणारी रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून राज्यातील 1ली ते 7 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याची घोषणा केली होती. ज्यावर सोमवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोवीडचा नवा व्हेरीयंट ओमीक्रॉनमूळे काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतेलली व्यक्ती कोवीड पॉझिटिव्ह आल्यानंतर तर या चिंतेत अजूनच भर पडली आहे. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाकडून जास्त खबरदारी घेण्यात येत असून आरोग्य यंत्रणेला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. त्यातच केडीएमसी क्षेत्रातील 1 ली ते 7 वीच्या शाळा सुरू करायच्या की नाही याचा निर्णय घेण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती उद्या बैठक होणार आहे. त्यामध्ये शासनाने दिलेल्या निर्णयावर चर्चा केली जाईल आणि सर्वंकष विचार करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे.
त्यामुळे राज्यात काही ठिकाणी उद्यापासून शाळा सुरू होत असल्या तरी कल्याण डोंबिवलीतील शाळांचा निर्णय उद्याच्या बैठकीत होणार असून तोपर्यंत शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना आणखी वाट पहावी लागणार आहे.