
कल्याण दि.3 ऑक्टोबर :
कल्याण पूर्वेतील लहान बोगद्याजवळील (कोळसेवाडी रिक्षा स्टँड) स्कायवॉक आणि सिद्धार्थ नगर येथील स्कायवॉकची लांबी खूप मोठी आहे. तसेच त्यावर चढण असल्याने नागरिकांना विशेषतः वयोवृद्ध-अपंग व्यक्तीना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याने या स्कायवॉकवर सरकते जीने ( एक्सीलेटर ) किंवा दोन्ही स्कायवॉकच्या मध्यभागी लिफ्टची व्यवस्था करण्याची मागणी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन निकम यांनी केली आहे. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जनता दरबारात भेट घेऊन नितीन निकम यांनी ही मागणी केली आहे.
स्कायवॉकच्या या मुद्द्यासह कल्याण रेल्वे स्टेशन (पूर्वेकडे) ते काटेमानीवली शाळेपर्यंत एकही सार्वजनिक शौचालय नसल्यानेही नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. खासकरून महिलांना याचा त्रास सहन करावा लागत असून कल्याण पूर्वेतील लहान बोगद्या जवळ(कोळसेवाडी रिक्षा स्टँडजवळ) आणि सिद्धार्थनगर येथील स्कायवॉकजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्याची मागणीही निकम यांनी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली.
दरम्यान या दोन्हीही समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.