महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून 8 पथकं तैनात
कल्याण डोंबिवली दि.31 डिसेंबर :
न्यू इयर सेलिब्रेशनसाठी एकीकडे सर्वांनी जोरदार पार्टीचे खास बेत आखले असून ठिकठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र हे न्यू इयर सेलिब्रेशन तुम्ही मर्यादेत राहून आणि भान राखून केलंत तर ठीक. नाही तर अतिउत्साही तळीरामांची झिंग आणि मस्ती उतरवण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे.(New Year Celebration: If you show too much enthusiasm, it will be expensive, strong police presence in Kalyan Circle)
गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण डोंबिवली परिसरात घडलेल्या विविध गुन्ह्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नशेबाज, मद्यपी, गर्दुल्ले अशा समाज कंटक प्रवृत्तींविरोधात अतिशय कडक भूमिका घेतली आहे. कल्याण परिमंडळ 3 चे डीसीपी अतुल झेंडे हे स्वतः जातीने रात्रीच्या वेळेस शहरामध्ये फिरून कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेताना दिसत आहेत. सुरू असणारी ही सर्व कारवाई पाहता “न्यू इयर सेलिब्रेशन”दरम्यान कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना घडू नये यासाठी कल्याण डोंबिवलीतील पोलीस प्रशासन आणखीनच दक्ष झाले आहे.
न्यू इयर सेलिब्रेशनचे स्वागत करताना नागरिकांच्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये यासाठी आम्ही विशेष खबरदारी घेत आहोत. नागरिकांनीही कायद्याच्या चौकटीत राहून न्यू इयरचे सेलिब्रेशन करावे असे आवाहन कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी केले आहे. तसेच 600 अधिकारी आणि कर्मचारी कल्याण डोंबिवलीमध्ये तैनात करण्यात आली असून महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष 8 पथके नेमण्यात आल्याचेही डीसीपी अतुल झेंडे यांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांचा हा तगडा बंदोबस्त पाहता न्यू इयरचे सेलिब्रेशन तुम्ही “कायद्यामध्ये राहून कराल तर फायद्यात राहाल” असे एकंदर परिस्थितीवरून स्पष्ट होत आहे.
असा असणार आहे पोलिसांचा बंदोबस्त…
2 सहाय्यक पोलीस आयुक्त
83 पोलीस अधिकारी
532 पोलीस अंमलदार
नाकाबंदी – १७ ठिकाणी
फिक्स पॉईंट व पायी पेट्रोलिंग
बीट मार्शल पेट्रोलिंग-२७
पेट्रोलिंग मोबाईल-२०
प्रतिबंधक पथक-०८,
छेड-छाड विरोधी पथक-०८
बार आस्थापना चेकिंग पथक-०९
तपास पथक-०८
गोपनीय पेट्रोलिंग पथक-०८
८ ब्रेथ एनालायझर मशीनसह १० ठिकाणी नाकाबंदी