Home ठळक बातम्या नविन पॉवर स्विपिंग गाड्या: रस्त्यावरील धुळीपासून कल्याणकरांची होणार सुटका

नविन पॉवर स्विपिंग गाड्या: रस्त्यावरील धुळीपासून कल्याणकरांची होणार सुटका

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपूराव्याला यश

कल्याण दि.23 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या ताफ्यामध्ये 4 नव्या अत्याधुनिक पॉवर स्विपिंग मशीन गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील धुळीतून नागरिकांची सुटका होण्यासह शहरही अधिक टापटीप दिसणार आहे. यासाठी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाठपुरावा केला असून आज या गाड्यांची आमदार विश्वनाथ भोईर यांनी पाहणी केली.

कल्याण शहरातील रस्त्यांवर असलेल्या धुळीमुळे नागरिकांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. तसेच अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याबद्दल आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावर आमदार भोईर यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत या समस्येवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी केली होती. केडीएमसी आयुक्त डॉ. जाखड यांनी यासंदर्भात विनाविलंब कार्यवाही करत या अत्याधुनिक पॉवर स्विपिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही कालावधीपूर्वीच या 4 पॉवर स्वीपर गाड्या केडीएमसीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असून त्यादिवशीपासून या गाड्या नागरिकांच्या सेवेत कार्यरत करण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले. या नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गाड्या असून आधीच्या गाड्यांपेक्षा अधिक शक्तिशाली आहेत. मुख्यतः सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या सफाईसाठी ही गाडी वापरण्यात येणार आहे. त्याव्दारे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरील साचलेली धूळ उचलून दुसरीकडे हा रस्ता पाण्याने स्वच्छ धुण्याचे कामही ही गाडी करणार आहे. तर डांबरी रस्त्यांसाठी शासनाकडून लवकरच दुसरी गाडी केडीएमसीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
तर कल्याणकर नागरिकांचा या धुळीच्या त्रासातून सुटका करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शासन आणि प्रशासनाकडून करण्यात आल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.
दरम्यान घनकचरा विभागाच्या या पॉवर स्विपिंग गाड्यांसह आमदार विश्वनाथ भोईर यांनी अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या अत्याधुनिक फायर बाऊजर गाड्यांचीही पाहणी करत समाधान व्यक्त केले.

यावेळी केडीएमसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, माजी नगरसेवक मोहन उगले, केडीएमसीचे उपअभियंता शाम सोनवणे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा