
नव्या उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करण्याची केली विनंती
कल्याण दि.1 मार्च :
कल्याण शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या शहाड आणि गांधारी येथील प्रस्तावित नव्या उड्डाणपुलांचे काम तातडीने सुरू करण्याची विनंती कल्याण पश्चिमेचे माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी केंद्रीय दळण वळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. नरेंद्र पवार यांनी आज मुंबई येथील निवासस्थानी गडकरी यांची भेट घेत या दोन्ही महत्त्वाच्या उड्डाणपुलांसंदर्भात ही मागणी केली आहे. (New flyovers at Gandhari and Shahad; Former MLA Narendra Pawar met Union Minister Nitin Gadkari)
कल्याण शहरातून पडघामार्गे नाशिकला जाण्यासाठी सध्या गांधारी नदीवरील पूल हा एकमेव पर्याय आहे. मात्र हा पुल बांधून जवळपास 30 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. सद्यस्थिती पाहता हा पूल अतिशय अरुंद असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या गेल्या तीन दशकांत प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यासोबतच राज्याच्या दृष्टीने गेमचेंजर प्रकल्प असणाऱ्या मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणारा इंटरचेंजही याच मार्गावरील आमणे गावात बांधण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण पडघा मार्गावरील वाहतूकीत येत्या काळात आणखी मोठी भर पडणार असून अस्तित्वात असलेला गांधारी पूल त्यासाठी निश्चितच अपुरा पडेल अशी वस्तुस्थिती आहे.
या जुन्या पूलाचा वापर बापगाव, सोनाळे, सावद, लोणार, पडघा, भिवंडी आणि नाशिक दिशेने जाण्यासाठी होतो. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये या भागात मोठ्या संख्येने व्यवसायिक गोडाऊनही झाली असून त्यातील हजारो कर्मचारीही दररोज याच मार्गावरून ये जा करत असतात. त्यातच समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज सुरू झाल्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची वाढीव संख्या आणि अस्तित्वात असलेल्या वाहनांची संख्या ही या पुलाच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. याचा विचार करता याठिकाणी 4 किंवा 6 पदरी प्रशस्त असा नविन समांतर पूल बांधण्याची गरज अधोरेखित करत नविन समांतर सहापदरी उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नरेंद्र पवार यांनी नितीन गडकरी यांच्याकडे यावेळी केली.
त्याचसोबत कल्याण शहराला केवळ मुरबाडच नव्हे तर थेट अहिल्यानगरला जोडणाऱ्या मार्गावरील शहाड उड्डाणपूल हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्रीय महामार्ग 61 वर हा उड्डाणपूल असून त्याद्वारे दररोज सुमारे दोन लाख वाहने येजा करत असतात. मात्र दरवर्षी पावसाळ्यात याठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुक कोंडीची मोठी समस्या निर्माण होत असते. यावर तोडगा म्हणून एमएमआरडीएकडून याठिकाणी नविन चार पदरी उड्डाणपूल बांधण्याची घोषणा केली आहे. मात्र प्रत्यक्षात अद्यापपर्यंत कोणत्याच कामाला सुरुवात झालेली नसल्याचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर गांधारीप्रमाणे शहाड परिसरातही उभारण्यात येणाऱ्या नव्या उड्डाणपुलाचे कामही वेगाने सुरू करण्याची आग्रहाची विनंती पवार यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
दरम्यान कल्याण शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या दोन्ही मुद्द्यांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचेही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.