
मुंबई दि.10 डिसेंबर :
‘पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया’(पीआरएसआय) या देशातील जनसंपर्क क्षेत्रातील शिखर संस्थेच्या मुंबई चॅप्टरची नवीन कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अजीत पाठक यांनी नुकतीच जाहीर केली आहे. नवीन कार्यकारणीत अध्यक्षपदी ‘एचपीसीएल’चे मुख्य महाव्यवस्थापक(सांघिक संवाद) राजीव गोयल यांची तर उपाध्यक्षपदी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.चे महाव्यवस्थापक(सांघिक संवाद) अलोक कुमार सिंह यांची निवड झाली आहे. अशी माहिती या कार्यकारणीत निवड झालेले नूतन सहसचिव महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी दिली.
नवीन कार्यकारणीत सचिवपदी नेहरू विज्ञान केंद्राचे सुहास नाईक-साटम तर कोषाध्यक्ष पदी ‘आरबीआय’च्या माजी व्यवस्थापक(सांघिक संवाद) सबिता बाडकर यांची नियुक्ती झाली आहे. याचबरोबर समितीत सदस्य म्हणून राज्यपाल भवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, मुंबई विद्यापीठातील पत्रकारिता विभागाच्या प्रा.दैवता चव्हाण-पाटील, फुलब्राईट नेहरू फेलो डॉ. पुष्पेंदर भाटीया, विवेकानंद इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅन्ड रिसर्चच्या प्रा.उमा भूषण, व्हीएफएस ग्लोबलच्या उपाध्यक्षा सुकन्या चक्रबर्ती, अॅड फक्टर्सचे उपाध्यक्ष नौमन कुरेशी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. अशीही माहिती सह सचिव विश्वजित भोसले यांनी दिली.
जनसंपर्क क्षेत्राचा विकास, जनसंपर्क क्षेत्राबद्दल समजात जागृती, जनसंपर्क मुल्यांची जोपासना, अनुभव आणि ज्ञानाचे आदान-प्रदान, जनसंपर्क क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थांना मार्गदर्शन, जनसंपर्क क्षेत्रातील चांगल्या कामाचा गौरव, जनसंपर्क क्षेत्रातील संशोधनास प्रोत्साहन, जनसंपर्काशी सबंधित विविध साहित्य प्रकाशित करणे इत्यादी विषयांवर पीआरएसआय ही संस्था भारतात १९६६ पासून कार्यरत आहे. या कार्यकारणीत सहसचिव म्हणून आपली झालेली निवड ही एक मोठी संधी असून या कार्यकारणीच्या अनुषंगाने मुंबई विभागात जनसंपर्क क्षेत्रात प्रभावीपणे कार्य करण्याचा मानस सहसचिव विश्वजित भोसले यांनी व्यक्त केला.