भिवंडी दि.4 एप्रिल :
आगामी लोकभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये बीडमधून बजरंग सोनावणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामूळे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याविरोधातील प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सस्पेन्स अखेर संपला आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा म्हणून काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. एकीकडे काँग्रेसकडून दयानंद चोरघे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना देण्यावरून मोठा खल सुरू होता. मात्र त्यात सुरेश म्हात्रे यांनी भिवंडी लोकसभेचा कौल आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर आणि मुरबाड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.
भारतीय जनता पक्षाकडून भिवंडी लोकसभेसाठी कपिल पाटील यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. आता कपिल पाटील यांना टक्कर देण्यासाठी शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आता कपिल पाटील आणि बाळ्यामामा यांच्यातील लढाईत कोण बाजी मारतय हे लवकरच स्पष्ट होईल.